जन्मतः वजन फक्त 700 ग्रॅम! 5 महिने मृत्यूशी झुंज आणि पुढे...; केईएममधील दुर्मिळ घटनेवर विश्वास बसणं अशक्य!
जन्मतः अवघे 700 ग्रॅम वजन असलेल्या मुदतपूर्व बालकावर केईएम रुग्णालयात पाच महिने उपचार. आता वजन 3.3 किलो झाले आहे. आईच्या स्तनपानावर वाढ सुरू झाल्यानंतर डिस्चार्ज मिळाला.
जन्माच्या वेळी अवघे 700 ग्रॅम वजन, मुदतपूर्व प्रसूती आणि त्यात नवजात बालकाची नाजूक प्रकृती… अशा आव्हानात्मक परिस्थितीत केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी पाच महिने अथक प्रयत्न करून एका बाळाला जीवदान दिले आहे. उपचारांनंतर या बाळाचे वजन आता 3.3 किलोग्रॅम झाले असून, त्याची वाढ सध्या आईच्या स्तनपानावर होत आहे. प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्यानंतर बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील नवजात शिशू उपचार सेवेचे महत्त्व या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
मुदतपूर्व जन्म, वजन अवघे 700 ग्रॅम
या बालकाचा जन्म नियोजित वेळेआधी झाला होता. जन्मतः त्याचे वजन केवळ 700 ग्रॅम होते. वैद्यकीय भाषेत अशा बालकांना अत्यंत कमी जन्मवजन असलेली नवजात बालके म्हणजे एक्स्ट्रीमली लो बर्थ वेट असे म्हटले जाते. अशा बालकांना श्वसन, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे, संसर्गाचा धोका आणि पोषण अशा अनेक बाबींमध्ये विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे जन्मानंतर या बाळाला तातडीने केईएम रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
एनआयसीयूमध्ये पाच महिने विशेष उपचार
केईएमच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात बाळावर सलग पाच महिने उपचार करण्यात आले. या काळात त्याला अतिदक्षता सेवा देण्यात आली. श्वसनासाठी विशेष वैद्यकीय सहाय्यही करावे लागले. मुदतपूर्व जन्मामुळे उद्भवणाऱ्या गुंतागुंतींवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांनी सातत्याने त्याच्या प्रकृतीचे निरीक्षण केले. प्रत्येक टप्प्यावर बाळाच्या आरोग्यातील बदल लक्षात घेऊन उपचारांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली.
डॉ. अनिता हरिबालकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली उपचार
नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. अनिता हरिबालकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर आणि परिचारिकांच्या पथकाने बाळाची काळजी घेतली. उपचारादरम्यान अनेक वैद्यकीय आव्हाने आली. मात्र, तज्ज्ञांचे समन्वय, नियमित निरीक्षण आणि परिचारिकांची सततची सेवा यामुळे बाळाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाल्याचे डॉक्टर सांगतात. अशा अतिशय कमी वजनाच्या बालकांच्या उपचारात प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. त्यामुळे वैद्यकीय पथकाला सातत्याने दक्ष राहावे लागते, असेही डॉक्टरांनी पुढे सांगितले.
700 ग्रॅमवरून वजन 3.3 किलोपर्यंत
पाच महिन्यांच्या उपचारांनंतर बाळाचे वजन 700 ग्रॅमवरून वाढून 3.3 किलोग्रॅम झाले. म्हणजेच जन्माच्या वेळच्या वजनाच्या तुलनेत जवळपास पाचपट वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, आता बाळाची वाढ आईच्या स्तनपानावर होत असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर डॉक्टरांनी बाळाला घरी घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
डॉक्टरांनी काय दिला सल्ला?
मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांना जन्मानंतर विशेष वैद्यकीय देखरेखीची गरज असते. त्यांचे वजन, श्वसन, पोषण आणि संसर्गाची लक्षणे यावर लक्ष ठेवणे आवश्यक असते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही नियमित बालरोगतज्ज्ञांचा सल्ला, वजनाची तपासणी आणि लसीकरण याकडे पालकांनी लक्ष द्यावे लागते, असे डॉक्टर सांगतात.