अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरात धक्कादायक घटना घडली आहे. या शहरातील श्रीराम मंदिरात मोठी चोरी झाली आहे. या मंदिरातील हनुमानजींचे चांदीचे मुकुट, दोन छत्र आणि गदा चोरट्यांनी लंपास केला आहे. विशेष म्हणजे मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण चोरीची घटना कैद झाली आहे. या फुटेजच्या आधारे पोलीस आता चोरट्यांचा कसून शोध घेत आहे. या घटनेमुळे बडनेरा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शहरात आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांसमोर लवकरात लवकर चोरट्यांच्या जेरबंद करण्याचे आवाहन करण्यात आलंय. याप्रकरणी बडनेरा रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असतानाच शेतकरी आत्महत्यांचं संकटही गंभीर होताना दिसत आहे. भातकुली तालुक्यातील निरुड गंगामाई येथे ६५ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी श्रीपत कडू यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कडू यांच्याकडे अवघी दोन एकर शेती होती. सोयाबीन पिकाचं नुकसान, डोक्यावर असलेलं जिल्हा बँकेचं कर्ज आणि खासगी कर्जाचा वाढता बोजा यामुळे ते आर्थिक संकटात सापडले होते अशी माहिती समोर येत आहे. या संकटातून मार्ग काढताना त्यांची मोठी कोंडी झाली होती. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण परिस्थितीत शासनाने आर्थिक मदत करून कुटुंबाला आधार द्यावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.