बापरे... 288 ऐवजी महाराष्ट्रात 432 आमदार अन् खासदारांची संख्या...; महिला आमदार, खासदार किती?
मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन विधेयक मंजूर झाल्यास केवळ लोकसभा नाही तर विधानसभेच्या जागांमध्येही वाढ होणार आहे. या विधेयकाच्या मंजुरीनंतर महाराष्ट्रामधील स्थिती नेमकी कशी असेल जाणून घ्या सविस्तरपणे...
मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन विधेयकाची संसदेत मांडली जाणारी प्रत समोर आली आहे. मतदारसंघ पुनर्रचनेत सध्याच्या जागांपेक्षा 50 टक्के वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभेच्या जागा 543 वरुन लोकसभेच्या जागा 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. या जागांमधील 33 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असतील. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना एकतृतीयांश म्हणजेच 33 टक्के आरक्षण लागू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. याच विधेयकामध्ये आता ही जागांची वाढ मान्य झाल्यानंतर 2051 पर्यंत जागांच्या पुनर्रचनेला स्थगिती देण्यात येणार असल्याचंही म्हटलं आहे. म्हणजेच जागांचे वाटप आणि मतदारसंघांची रचना सन 2051 पर्यंत कायम ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.
कशा वाढणार जागा?
नव्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर महिला आरक्षण लागू होणार असून लोकसभेच्या जागांमध्ये एकूण 50 टक्क्यांनी वाढ होणार आहे. राज्यांसाठी लोकसभेच्या कमाल जागा 530 वरून 815 करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच केंद्रशासित प्रदेशांसाठी जागा 20 वरून 35 करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे फक्त लोकसभेच्या जागा वाढणार नसून विधानसभांच्या जागाही वाढणार आहेत. राज्यांमधील विधानसभांची कमाल सदस्यसंख्या 500 वरून 650 करण्याचा प्रस्ताव या विधेयकाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. हे विधेयक मान्य झाल्यास लोकसभा आणि विधानसभांच्या जागांची नव्याने रचना होणार आहे.
महाराष्ट्रात किती खासदार असणार?
विधेयकातील प्रस्तावानुसार महाराष्ट्राच्या राजकीय नकाशातही बदल होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्राच्या लोकसभेच्या जागा 48 वरून 72 होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात सध्या लोकसभेच्या 48 जागा आहेत. विधेयकात प्रत्येक राज्याच्या लोकसभेतील जागांमध्ये 50 टक्के वाढ करण्याची तरतूद आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जागा 48 वरून 72 होऊ शकतात. म्हणजेच महाराष्ट्राला लोकसभेत 24 अतिरिक्त जागा मिळण्याची शक्यता आहे.
विधानसभेमध्येही मोठा बदल; एकूण आमदार किती?
हे विधेयक मंजूर झालं तर महाराष्ट्र विधानसभेच्या जागा 288 वरून 432 होऊ शकतात असं सांगितलं जात आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची सध्याची सदस्यसंख्या 288 आहे. विधेयकानुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेतील एकूण जागांमध्ये 50 टक्के वाढ करण्याची तरतूद आहे. त्यानुसार महाराष्ट्र विधानसभेची सदस्यसंख्या 432 होऊ शकते. म्हणजेच 144 अतिरिक्त आमदारांच्या जागा महाराष्ट्रात तयार होतील असं सांगितलं जात आहे.
महाराष्ट्रातील महिलांना किती राजकीय संधी मिळणार?
लोकसभेतील 72 जागांपैकी जवळपास एकतृतीयांश जागा महिलांसाठी राखीव असतील. 72 जागांचा विचार केल्यास सुमारे 24 जागा महिलांसाठी राखीव होऊ शकतात. विधानसभेच्या 432 जागांपैकी सुमारे 144 जागा महिलांसाठी राखीव होऊ शकतात. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या महिलांनाही या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.