महाराष्ट्र हादरला! दारासमोर लावलेली पणती ठरली जीवघेणी? एकाच घरातील 6 जणांचा होरपळून मृत्यू
धाराशिवमध्ये अत्यंत वाईट घटना घडली आहे. घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
लक्ष्मीपूजन दिवाळीचा पहिला दिवस, या दिवशी घरासमोर रांगोळी अन् दिव्यांची आरास केली जाते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजीही केली जाते. धाराशिवच्या येडशीत दिवाळीच्याच दिवशी एक मोठी दुर्घटना घडली आहे. घराला आग लागून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, एक जण मात्र सुदैवाने बचावला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवमध्ये गोविंद करंडे यांच्या घराला मध्यरात्री आग लागली. गोविंद करंडे यांचे किराणा अँड जनरल स्टोअर असे दुकान आहे. तर, त्यांचे कुटुंब किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर ते राहतात. मध्यरात्री घराला आग लागल्याने घरात असलेल्या सहा जणांचा यामध्ये गुदमरून मृत्यू झाला.
किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर कुटुंब राहत होते. त्यामुळे आगीतून बाहेर पडू न शकल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर, मध्यरात्रीपासून गावकरी आणि अग्निशामन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. मात्र आगीने रौद्र रूप घेतल्याने ही भीषण घटना घडली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दिवाळीनिमित्त घरात लावलेल्या पणत्यामुळेच आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. मात्र आगीचे ठोस कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
सोलार प्लांटला लागली आग
धाराशिव तालुक्यातील कवडगाव येथे अडीचशे एकर वरती असलेल्या सोलार प्लांटला लागल्याची घटना घडली आहे.
आगीमध्ये 25 ते 30 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची प्रार्थमिक माहिती समोर येतेय. अडीचशे एकर पैकी 100 एकर वरील सोलर प्लांट जळून खाक झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागून प्लांटमध्ये असलेल्या गवतामुळे आग पसरल्याची माहिती समोर येतेय. तसंच, आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाहीये.
फटाक्यांमुळं अग्नीतांडव
मुंबईत फटाक्यांच्या आतषबाजीने अनेक दुर्घटनांची नोंद झाली आहे. मुंबईत दोन दिवसांत आगीच्या 89 घटना घडल्या असून, त्यापैकी 28 घटनांना फटाके कारणीभूत ठरल्याची नोंद अग्निशमन दलाकडे झाली आहे. आगीच्या घटनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत.
उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, गल्ल्या आणि फुटपाथवर फटाके फोडण्यास बंदी घातली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेनेही मुंबईकरांना फटाके न फोडण्याचे अवाहन केले आहे.