Vasai News : वसईच्या राजीवली पाल नगर परिसरात उपचारासाठी क्लिनिकमध्ये नेलेल्या 12 वर्षीय मरियम अन्सारीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. चुकीचे उपचार आणि डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, संबंधित व्यक्ती बेकायदेशीरपणे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याच्या संशयावरून पेल्हार पोलिसांनी बोगस डॉक्टरप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, उलट्यांचा त्रास झाल्यानंतर मरियमला राहुल क्लिनिकमध्ये नेण्यात आले होते. तेथे तिला दोन इंजेक्शन देण्यात आली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी तिची प्रकृती अचानक खालावली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. क्लिनिकमध्ये मुदत संपलेली औषधे आढळल्याची माहितीही प्रशासनाकडून समोर आली असून, उपचारात नेमकी कोणती औषधे आणि इंजेक्शन देण्यात आली, याचा तपास सुरू आहे.
मात्र, या घटनेनंतर प्रशासनाच्या कारभारावरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मृत्यूनंतर शवविच्छेदनासाठी नेण्यात आलेला चिमुरडीचा मृतदेह तब्बल 12 तास रुग्णालयाच्या पत्र्याच्या शेडमध्ये पडून होता. नवघर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन होणार नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर कुटुंबीयांना स्वतःच्या खर्चाने मृतदेह मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आल्याचा आरोप आहे. अखेर स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर रात्री उशिरा रुग्णवाहिका उपलब्ध झाली आणि मृतदेह जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला.
मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन आणि वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, उपचारातील कथित हलगर्जीपणा, डॉक्टरची वैद्यकीय पात्रता आणि तब्बल 12 तास शवविच्छेदनासाठी झालेली प्रतीक्षा यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.