रेल्वे प्रशासाने 10 हजार 145 कोटी रुपयांचा एक मेगा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. या प्रोजेक्टमुळे मुंबई ते नाशिक प्रवास अधिक सुखकर होणार असून या मार्गावरील प्रवास अधिक वेगवान होऊन प्रवासी क्षमता वाढणार आहे. हा प्रकल्प नेमका आहे कसा? यासाठी कुठली जमीन सरकारला घ्यावी लागणार आहे? नेमका कोणत्या भागांना जोडणार हा प्रोजेक्ट जाणून घेऊयात...
45 गावांमधील 825 एकरांहून अधिक जमीन करणार अधिग्रहित
तर रेल्वे प्रशासनाचा हा महत्त्वकांशी प्रोजेक्ट कसारा-मनमाडदरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गासंदर्भातील आहे. यासाठी 45 गावांतील जमिनींचे अधिग्रहण केले जाणार आहे. ही गावं नाशिकसहीत एकूण पाच तालुक्यांमधील असून या शेतकऱ्यांकडून जमिनी घेतल्या जाणार आहेत. एकूण 825.33 एकर म्हणजे 334 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे.
कसा असणार हा प्रोजेक्ट?
या प्रकल्पामुळे मुंबई, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रादरम्यान रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. कसारा-मनमाड दरम्यान, 24 किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्यात येणार रेल्वे मार्गावर 21 भुयारी मार्गांची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी 10 हजार 145 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुढील पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे. प्रवासी वाहतुकीसोबत मालवाहतुकीलाही या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. दरवर्षी, अतिरिक्त 4 कोटी 61 लाख टन मालवाहतूक हाताळणे या प्रकल्पामुळे शक्य होणार आहे. उद्योग, व्यापार, शेतीमाल वाहतूक आणि पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पामुळे रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
235 लहान-मोठे पूल
कसारा-मनमाड मार्गावर एकूण 235 लहान-मोठे पूल उभारले जाणार असून यापैकी तीन महत्त्वाचे पूल असून 16 पूल मोठे तर 218 लहान पूल असतील. तसेच कसारा ते इगतपुरी या थळ घाट विभागात पाच नवीन बोगदे बांधले जाणार आहेत. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, कसारा घाटातील तीव्र चढामुळे सध्या गाड्यांना मागे 'बँकर इंजिन' जोडावे लागतात. नवीन मार्गिकांचा उतार सुसह्य असल्याने बँकर इंजिनांची गरज राहणार नसून यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
कोणत्या तालुक्यात किती गावं? थेट लोकल सुरु करण्याची संधी
निफाड तालुक्यातील 17 गावांमधील जमीन यासाठी वापरली जाणार आहे. तसेच नाशिकमधील 16, चांदवड तालुक्यातील 7, इगतपुरीमधील चार आणि नांदगावमधील एका गावातून या प्रकल्पाअंतर्गत उभारली जाणारी मार्गिका जाणार आहे. सध्या हा मार्ग 138 टक्के क्षमतेने चालतो. चार मार्गिका पूर्ण झाल्यावर अधिक प्रवासी गाड्या या मार्गावर धावू शकतील आणि भविष्यात नाशिक ते मुंबई थेट लोकल सेवा सुरू करण्याचा मार्गही मोकळा होईल अशी अपेक्षा आहे.