महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे आणि अमरावती या दोन शिक्षक मतदारसंघांचा निकाल आज लागणार आहे. यासाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडलं. सकाळी आठ वाजल्यापासून या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. शिक्षक मतदारसंघांच्या या निवडणुकीत पुणे विभागातून 30 उमेदवार आणि अमरावती विभागातून 25 उमेदवार रिंगणात आहेत. महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्षांमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळत आहे. या मतदारसंघांमधून कोणी निवडणूक लढवली आणि कोणाकोणात चुरशीची लढाई होणार आहे ते पाहूयात...
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ
पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्येच अंतर्गत चुरस पाहायला मिळणार असून एकूण 30 उमेदवार पुण्यातून नशीब आजमावत आहेत. महायुतीमध्ये असलेल्या मतभेदांमुळे गाजलेल्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार बाजी मारतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निवडणुकीमध्ये शिंदे काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या निवडणुकीतील भाजपाच्या बंडखोर उमेदवारामुळे झालेल्या दगाफटक्याचा हिशोब बरोबर करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कोणत्या पक्षातून कोण ही निवडणूक लढलं आहे ते पाहूयात...
* कौस्तुभ मुरलीधर गावडे – भारतीय जनता पार्टी (महायुतीचे अधिकृत उमेदवार)
* जयंत आसगावकर – काँग्रेस (महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार - विद्यमान आमदार)
* सचिन सानप – शिवसेना - (एकनाथ शिंदे गट पुरस्कृत उमेदवार)
* दत्तात्रय सावंत – अपक्ष (माजी आमदार / बंडखोर उमेदवार)
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ
पुण्याबरोबरच अमरावतीमध्येही शिक्षक मतदारसंघाचसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी महायुतीचे विद्यमान आमदार विरुद्ध महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्येच तिरंगी तसेच चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. या निवडणुकीमधील अमरावतीतील 25 उमेदवारांपैकी चार महत्त्वाचे उमेदवार कोणते ते पाहूयात...
* किरण रामराव सरनाईक – शिवसेना - एकनाथ शिंदे गट (महायुतीचे अधिकृत उमेदवार - विद्यमान आमदार)
* अदिती पोहरे – काँग्रेस (महाविकास आघाडीचे उमेदवार)
* दत्तात्रय लहाने – शिवसेना - )उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार)
* दिलीप कडू – )अपक्ष/बंडखोर उमेदवार)
ही निवडणूक का घेतात? कोण मतदान करतं?
शिक्षक मतदारसंघाचे आमदार हे थेट राज्यातील शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात. राज्यघटनेच्या कलम 171 नुसार या विशेष आमदारांची निवड केली जाते. शिक्षक मतदारसंघातील आमदार हे सर्वसामान्य नागरिक निवडून देत नाहीत. ज्या शिक्षकांनी माध्यमिक शाळा किंवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक संस्थेत किमान तीन वर्षे शिक्षक म्हणून काम केले आहे आणि ज्यांची मतदार म्हणून नोंदणी झाली आहे, तेच शिक्षक या निवडणुकीत मतदान करून आपले प्रश्न मांडणारा प्रतिनिधी म्हणून या आमदारांना निवडून देतात.