केंद्र सरकारच्या प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषद घेत या विधेयकाला विरोध दर्शवला. अनुसूचित जाती-जमातींच्या राजकीय प्रतिनिधित्वावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे डिलिमिटेशनची जबाबदारी देण्याच्या प्रस्तावावरही त्यांनी आक्षेप घेतला. काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे? सविस्तर जाणून घेऊया.
डिलिमिटेशन प्रक्रियेत अनुसूचित जाती म्हणजेच एससी आणि अनुसूचित जमाती म्हणजेच एसटीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागांचे प्रतिनिधित्व वाढले पाहिजे, अशी मागणी खर्गे यांनी केली. म2027 मध्ये जनगणना होणार असताना सरकारने तिचा डिलिमिटेशन प्रक्रियेत कसा वापर केला जाणार?, हे स्पष्ट न केल्याचे ते म्हणाले.
डिलिमिटेशन प्रक्रियेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भूमिका महत्त्वाची असणार असल्याच्या मुद्द्यावर खर्गे यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या मते, निवडणूक आयुक्तांकडेच ही जबाबदारी दिल्यास प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्न निर्माण होऊ शकतात. आसाम आणि जम्मू-काश्मीरमधील मतदारसंघ पुनर्रचनेचा संदर्भ देत त्यांनी सरकारवर टीका केली. आरक्षित मतदारसंघांचे स्वरूप बदलून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
पत्रकार परिषदेत खर्गे यांनी मतदार यादीतून सुमारे 10 कोटी लोकांची नावे हटवण्यात आल्याचा दावा केला. अशा परिस्थितीत निवडणूक आयुक्तांकडे डिलिमिटेशनची जबाबदारी देणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षणादरम्यान 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील प्रारूप मतदार याद्यांमधून 13 कोटींपेक्षा अधिक नावे वगळण्यात आली होती.
खर्गे यांनी एप्रिलमध्ये संसदेत आणलेल्या विधेयकाचा संदर्भ देत सरकारवर राजकीय समीकरणे जुळवण्याचा आरोप केला. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फूट यांचा उल्लेख करत त्यांनी सरकारने राजकीय पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा केला. त्यांच्या मते, डिलिमिटेशनच्या माध्यमातून देशातील लोकशाही व्यवस्था आणि विरोधी पक्षांचे प्रतिनिधित्व प्रभावित होऊ शकते.
खर्गे यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधत सरकारच्या धोरणांमुळे संविधान आणि लोकशाही धोक्यात येऊ शकते, असा आरोप केला. सत्ताधाऱ्यांच्या हातात डिलिमिटेशन हे राजकीय हत्यार बनू शकते, असा दावाही त्यांनी केला. मनुस्मृतीच्या अंमलबजावणीचा प्रयत्न होईल, अशी टीका करत त्यांनी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन विधेयकाला विरोध करण्याचे आवाहन केले. राहुल गांधी यांची सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. डिलिमिटेशन आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर ते काय भूमिका मांडतात?, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.