राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात दाखल असताना प्रफुल्ल पटेल त्यांच्या भेटीसाठी पोहोचल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण सुरु झालं. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक कयास लावण्यात आले. त्यात 10 नोव्हेंबरचा उल्लेख असल्याने त्याबाबत अनेक दावे-प्रतिदावे होऊ लागले होते. दरम्यान आता स्वत: प्रफुल्ल पटेल यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ते गोंदियात माध्यमांशी संवाद साधत होते.
"दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा आम्ही हॉस्पिटलमध्ये करणार आहोत का?," असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे. पवार साहेबांची स्थिती चांगली राहो ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे असंही ते म्हणाले आहेत. तसंच 10 तारखेच्या पूर्वी मी गोंदियाला असतो, त्यानंतर येऊन मी मुंबईला आल्यावर आपल्याशी चर्चा करतो असे सांगितले," असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
"शरद पवार हे माझ्यासाठी आदरणीय आहेत. मी अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना भेटायला गेलो होते. 10 तारखेनंतर परत येऊन भेटणार असं त्यांच्याशी बोलणं झालं. विलिनीकरणासंदर्भात हॉस्पिटलमध्ये कुठलीही चर्चा झाली नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे आणि या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या सोबत राहणार त्यांना दिलासा देणार असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. दादांचा अपघात झाला नसता तर विलिनीकरण झालं असतं असा दावा सुनील तटकरेंनी केला आहे. सुनील तटकरे यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. मुख्यमंत्री फडणवीसांनी सावध भूमिका घेतलीय.. तर महेंद्र थोरवे, रुपाली ठोंबरे, संजय राऊत आणि रोहित पवारांनी या मुद्द्यावरून वेगवेगळे सवाल उपस्थित केलेत.
अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या एकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. मात्र या चर्चेवरून आता नेत्यांमध्येच जुंपलीय. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत आमच्यासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र पक्ष आहेत त्यांच्या पक्षांचे निर्णय त्यांनीच घ्यायचे आहेत.
त्यांच्या अंतर्गत निर्णयांवर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. मात्र दोन्ही पक्षांना एकत्र यायचं असेल किंवा विलीनीकरणाबाबत चर्चा करायची असेल तर भाजपला विश्वासात घ्यावं लागेल. कारण एनडीएमध्ये भाजप सर्वात मोठा भागीदार आहे असंही फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान सुनील तटकरेंनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादीतच आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत... अजित पवार हयात असताना विलीनीकरणाच्या 13 बैठका झाल्या. मग या बैठकांमध्ये सुनील तटकरे का नव्हते? असा सवाल आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थित केला आहे. तटकरेंचा हा सगळा खटाटोप अर्थखात्यासाठी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान रुपाली ठोंबरेंनीही तटकरेंना लक्ष्य केलंय. तटकरेंना 9 महिन्यांनंतर आताच कंठ का फुटला? इतके दिवस ही माहिती पक्षापासून का लपवली? असे सवाल त्यांनी उपस्थित केलेत. सुनेत्रा पवार यांना अडचणीत आणण्यासाठीच तटकरेंचं हे विधान आहे का? अशी शंकाही ठोंबरेंनी व्यक्त केलीय.