40 रुपयांचा टोल वाचवण्यासाठी 7 जणांनी समृद्धी महामार्गावर गमावला जीव, टोलनाक्यावरील वाद अन् पुढच्या क्षणी...
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे जवळ समृद्धी महामार्गावर ट्रक आणि बुलेरो टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघाताबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
अमरावती जिल्ह्याच्या धामणगावजवळील समृद्धी महामार्गावर ट्रक आणि बुलेरो टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. नवरात्रीत्सवासाठी दुर्गादेवीची मूर्ती आणायला गेलेल्या तरुणांचा ती एक चूक किंवा हट्टीपणा सात जणांच्या जीवावर बेतला. पोलिसांनी केलेल्या तपासात या अपघाताबद्दलची मोठी अपडेट समोर आली आहे. असं समोर आलंय की, टोलनाक्यावर ट्रॉली जोडल्याने अडवलेल्या पिकअप वाहनासाठी सव्वा तास या तरुणांनी हुज्जत घातली. एवढंच नाहीतर ४० रुपयांचा टोल वाचवण्यासाठी राजकीय दबाव दाखवून त्यांनी पिकअप गाडी समृद्धी महामार्गावर ८० किमी प्रतितास वेग मर्यादा असतानाही त्यांनी तिसऱ्या लेनमध्ये अवघ्या १० ते १२ किमी प्रतितास वेगाने जात होते. समृद्धी महामार्गावरील वेग मर्यादाचे नियम धाब्यावर बसवल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.
वर्ध्यातील नवदुर्गा उत्सव समितीचे कार्यकर्ते दरवर्षी मोठ्या उत्साहाने नवरात्र साजरा करतात. यंदाही मोठ्या भक्तीभावाने ही मंडळी शेगाववरून दुर्गा मातेची मूर्ती आणण्यासाठी गेले, पण काळाने घाला घातला. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये हे तरुण मोठ्या उत्साहात दिसत होते. नारळ फोडून रीतसर पूजा करुन जय माता दीचा जयघोष करत ते वर्ध्याच्या दिशेने निघाले होते. पण त्यापूर्वीच त्यांच्या टेम्पोला अपघात झाला आणि सात जणांचा मृत्यू तर २१ जण जखमी झाले आहेत.
शेगाववरून वर्ध्याकडे परत येत असताना आज पहाटेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर धामणगाव रेल्वेजवळ हा भीषण अपघात झाल्यामुळे वर्ध्यावर एकाच वेळी अनेक कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळलंय. वर्धा अवघे 50 किलोमीटर अंतरावर उरलेले असताना एका ट्रकने बोलेरो पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली आणि क्षणात होत्याच नव्हतं झालं. धडक एवढी भीषण होती की पिकअप वाहनाचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मृत आणि जखमी हे वर्ध्यातील सोमनाथे लेआऊट, रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अनेक कुटुंबावर सणासुद्दीच्या काळात दु:खाचे डोंगर कोसळलंय. दरम्यान पोलिसांकडून घटनेची सविस्तर चौकशी करण्यात येत आहे.