'मोदी हे वेड घेऊन पेडगावला निघाले आहेत,' सामना 'रोखठोक'मधून हल्लाबोल; 'अमित शाह यांचे स्थान धोक्यात...'
लोकशाही म्हणजे लोकांच्या मतदानातून निर्माण झालेली सत्ता. गेल्या दहा-बारा वर्षांत मोदी, शहा, राजीवकुमार, ज्ञानेशकुमारांसारख्यांनी मतपेटीतली निकाल व्यवस्था उद्ध्वस्त केली असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना 'रोखठोक'मधून केली आहे.
लोकशाही म्हणजे लोकांच्या मतदानातून निर्माण झालेली सत्ता. गेल्या दहा-बारा वर्षांत मोदी, शहा, राजीवकुमार, ज्ञानेशकुमारांसारख्यांनी मतपेटीतली निकाल व्यवस्था उद्ध्वस्त केली असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना 'रोखठोक'मधून केली आहे. मोदी हे वेड घेऊन पेडगावला निघाले आहेत. मोदी ज्यांना ‘दिमागी नक्षलवादी’ म्हणत आहेत, ती लोकशाहीप्रेमी सामान्य जनता आहे असंही त्यांनी सुनावलं आहे. त्यामुळे लोकशाहीचे निकाल यापुढे रस्त्यावर लागतील असा इशाराही दिला आहे.
काय लिहिलंय सामना रोखठोकमध्ये?
दिवाळीचा उत्सव संपला आहे. पंतप्रधान मोदी बस्तरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करून आले. तेथेही त्यांनी ‘दिमागी नक्षलवाद’ वगैरे विषयांवर राजकीय भाषण ठोकले. ‘दिमागी नक्षलवाद’ हा संविधानासाठी धोका असल्याचे मोदी म्हणाले. दिमागी नक्षल म्हणजे त्यांचे राजकीय विरोधक. मोदी हे वेड घेऊन पेडगावला निघाले आहेत. मोदी ज्यांना ‘दिमागी नक्षलवादी’ म्हणत आहेत, ती लोकशाहीप्रेमी सामान्य जनता आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत.
यावेळी त्यांनी ‘दिमागी नक्षल’ जनतेच्या मागण्या काय आहेत? तेदेखील मांडलं आहे. त्या खालीलप्रमाणे - े
- देशात भरमसाट महागाई वाढली आहे. ती नियंत्रणाखाली आणा.
- बेरोजगारांना नोकऱ्या द्या.
- भारताचा निवडणूक आयोग व त्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे निष्पक्ष नसून भाजपचे ‘हरकामे’ म्हणून काम करत आहेत. त्यांचा राजीनामा घ्या.
- बेकायदेशीर पद्धतीने मतदार यादीतून साडेतेरा कोटी नावे वगळली आहेत, त्या सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार बहाल करा.
- कोल्हापूरच्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘समविचारी’ पॅनेल जिंकले. भाजपचे पॅनेल पराभूत झाले. तरीही पराभूतांनाच ‘गोकुळ’ची सूत्रे देण्यासाठी चार नवे संचालक सरकारने नियुक्त केले आणि बहुमतावर दबाव आणून सत्ता मिळवली. तेथील बहुमताचा आदर करा.
- शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष फोडून त्यांची मालकी व चिन्ह अमित शहांचे ‘हस्तक’ असलेल्या लोकांना देऊन लोकशाहीचा खून केला व त्याबाबत न्याय होऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टावर दबाव आणला जात आहे. हे प्रकार थांबवा.
- एका पक्षातून निवडून आलेल्या आमदार, खासदारांनाही विकत घेणे थांबवा.
- गुन्हेगारांना अभय देणारे भाजपचे वॉशिंग मशिन बंद करा.
- शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करा. शेतमालाला हमीभाव द्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा.
- भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण नको व देशाची सार्वजनिक संपत्ती एक-दोन उद्योगपतींना कवडीमोल भावात देण्याची प्रक्रिया थांबवा.
- जंगले वाचवा. जल, जमीन, जंगल वाचवण्यासाठी लढणाऱ्या आदिवासींना ‘नक्षलवादी’ ठरवून मारू नका.
- ईडी, सीबीआयचा दुरुपयोग बंद करा.
- जंतरमंतर जनतेच्या आंदोलनासाठी मुक्त करा. त्यासाठी ‘तिरंगा’ आंदोलन करणाऱ्यांना देशद्रोही ठरवू नका.
- धर्मांध राजकारणाला टाळे लावा.
- मुख्य म्हणजे भारतीय संविधानाशी बेइमानी करू नका.
- या मागण्या करणाऱ्या भारतीय नागरिकांना पंतप्रधान मोदी हे ‘दिमागी नक्षलवादी’ ठरवत आहेत. यावरून कोणाचे ‘दिमाग’ फिरले आहे, याची कल्पना यावी.
'मोदी भारताचे राजा आणि अमित शाह दिवाणजी'
पुढे म्हटलं आहे की, "भारतीय प्रजासत्ताकाचे ‘हाल’ मोदी काळात सुरूच आहेत. संविधानाची कोणतीही रचना मोदी व त्यांचे लोक स्वीकारायला तयार नाहीत. कायदा हा नागरिकांना व लोकशाहीवादी संस्थांना संरक्षण देणारा असला पाहिजे, हे तत्त्व या काळात मोडून पडले आहे. मोदी हे भारताचे ‘राजा’ बनले आहेत व अमित शहा त्यांचे दिवाणजी. पुन्हा हा देश स्वतंत्र करण्यात व घडवण्यात त्यांचे काडीमात्र योगदान नाही. अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यात जॉर्ज वॉशिंग्टनने मोठेच शौर्य गाजवले होते. राज्यव्यवस्था निर्माण होत असताना घटना समितीच्या एका सदस्याने वॉशिंग्टनच्या शौर्याची स्तुती केली व वॉशिंग्टनला अमेरिकेचा राजा करण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव खुद्द वॉशिंग्टननेच फेटाळून लावला. प्रजासत्ताक राज्याची कल्पना स्वीकारण्यात आली. घटना समितीच्या बैठकीनंतर एका वृद्ध महिलेने बेंजामिन फ्रँकलिनला विचारले, “आपल्याला काय मिळाले?” “म्हणजे?” राजेशाही की प्रजासत्ताक?” फ्रँकलिनने उत्तर दिले, “प्रजासत्ताक, पण तुम्ही ते टिकवलेत तर!”
"प्रजासत्ताकाला अध्यक्ष हवा असे ठरले. मग अध्यक्षास कसे संबोधावे, हा प्रश्न आला. ‘द प्रोटेक्टर, हिज एक्सलन्सी, हिज मायटी केअर’ याप्रमाणे संबोधावे, असा प्रस्ताव आला. वॉशिंग्टनने तो फेटाळला. अध्यक्षास ‘मिस्टर’ असेच संबोधावे असे तो म्हणाला व तेच मान्य झाले. भारतात मागच्या बारा वर्षांत राष्ट्रपतींचे महत्त्व संपवले गेले व पंतप्रधान (मोदी) म्हणजे साधे मनुष्य नाहीत तर ते ‘भगवान’ आहेत, विष्णूचा अवतार आहेत, त्यांना पदावरून हटवता येणार नाही, असे चित्र निर्माण केले गेले. मग त्यासाठी ज्ञानेशकुमार वगैरे भक्तांना कष्ट घ्यावे लागतात. ते कष्ट काय ते आता उघड झाले आहे," अशी टीका केली आहे.
"प्रे. ट्रम्प हे स्वतःला ‘पोप’ आणि ‘ख्रिस्त’ यापेक्षा मोठे समजू लागले. त्यांचा दारुण पराभव अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत झाला. तिकडे इस्रायलमध्ये युद्धखोर आणि घमेंडी नेतान्याहू यांचाही पराभव ‘ज्यू’ जनतेने केला. भारतातील जनता आता रस्त्यावर उतरली आहे. दहा वर्षांत याच जनतेला ‘संघर्षा’चे विस्मरण झाले होते. देशाची लोकसंख्या १४० कोटी आहे. ही संपूर्ण जनता अंधभक्त प्रकारात मोडणारी नाही. इंग्रज राजवटीवर आंधळे प्रेम करणारा मोठा वर्ग स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात होता, पण इंग्रजांच्या अंधभक्तांची पर्वा न करता क्रांतिकारकांनी सत्तेच्या खुर्चीखाली बॉम्ब फोडले. महात्मा गांधींच्या सांगण्यावरून तुरुंग भरले. ‘चले जाव’च्या आंदोलनात मुंबईतील गिरणी कामगार रस्त्यावर आला. इंग्रजांनी दडपशाही केली तरी ते स्वातंत्र्याचे आंदोलन मोडू शकले नाहीत. भारतात सध्या नेमकी तीच स्थिती आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.
'शहा यांचे स्वतःचेच स्थान धोक्यात'
"जनतेला मोदी व शहांचे ओझे आता फेकून द्यायचे आहे. राहुल गांधी यांनी दिलेले एकही आव्हान स्वीकारायला आपले पंतप्रधान तयार नाहीत. पुन्हा मोदी यांच्या वतीने गृहमंत्री अमित शहाच आता बोलत आहेत. शहा यांचे स्वतःचेच स्थान धोक्यात आले आहे. ते मोदींना कसे वाचवणार? लोकशाहीत निकाल मतपेटीतून लावण्याची प्रथा मोदी-शहा, ज्ञानेशकुमार यांनी नष्ट केली. त्यामुळे यापुढे लोकशाहीचे निकाल रस्त्यावर लागतील. रामलीला, जंतरमंतर ते गोकुळ; सर्वत्र तेच चित्र दिसत आहे. हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटलांसारखे लोक किती लाख लोकांना उद्ध्वस्त करणार?," अशी विचारणा त्यांनी केली आहे.