दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झालाय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेयत. अजित पवार यांच्या अपघातामागे घातपात होता का? आणि त्यामध्ये तटकरे यांचा काही सहभाग होता का?, या दिशेने चौकशी करण्याची मागणी कदम यांनी केली. या आरोपांवर सुनील तटकरे यांनी अखेर मौन सोडलंय. काय म्हणाले सुनील तटकरे? सविस्तर जाणून घेऊया.
रामदास कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपाताची शक्यता तपासली पाहिजे आणि त्या अनुषंगाने तटकरे यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तटकरे हे अजित पवार यांच्या जवळचे का होते, असा सवालही कदम यांनी उपस्थित केला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
कदम यांनी तटकरे यांच्यावर टीका करताना माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचाही संदर्भ दिला. तटकरे हे पूर्वी अंतुले यांचे स्वीय सहायक होते, असा उल्लेख करत अंतुले यांच्याबाबतही त्यांनी गंभीर आरोप केले. जो नेता तटकरे यांना जवळ करतो, त्याच्याबाबत पुढे अडचणी निर्माण होतात, असेही ते म्हणाले.
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांना उपमुख्यमंत्री व्हायचे होते, अशी चर्चा आपण ऐकल्याचे रामदास कदम यांनी म्हटले. याच राजकीय महत्त्वाकांक्षेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या विमान अपघातातील संभाव्य घातपाताच्या दिशेनेही तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.
रामदास कदम यांच्या आरोपांनंतर सुनील तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे त्यांनी सांगितले. याचा मी तीव्र शब्दात मी निषेध करतो. रामदास कदमांची मानसिक स्थिती पाहता त्यांना ठाण्यापेक्षा आग्र्याला मानसिक स्थिती तपासणीला पाठवावे. अंतुलेंबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. यासंदर्भात कायदेशीर नोटीस त्यांना मी पाठवणार असल्याचे सुनिल तटकरे म्हणाले. माझ्यावर आरोप करण्याआधी अनिल परब यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांवर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे. माझी राजकीय पार्श्वभूमी देशाचे पंतप्रधान,गृहमंत्री यांना माहिती आहे. पार्श्वभूमीचा अर्थ वेगवेगळा होतो. कोणाची राजकीय पार्श्वभूमी काय आहे, हे सर्वांना माहितीय, असेही तटकरे यावेळी म्हणाले. ज्यावेळी नारायण राणेंनी शिवसेना सोडली आणि मुंडे यांचे विरोधीपक्षनेते पदाचे पत्र दिले. त्यावेळी रामदास कदम माझ्या बंगल्यावर आले आणि हातापाया पडले. हे खरं की खोटं त्यांनी त्यांच्या जागृत देवस्थानाला स्मरुन सांगावे, असे आवाहन त्यांनी केले.
रामदास कदम आणि सुनील तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष नवा नाही. रायगड, रत्नागिरी आणि कोकणातील राजकीय वर्चस्वावरून दोन्ही नेत्यांमध्ये यापूर्वीही मतभेद झाले आहेत. अलीकडेच खेडमधील पोयनार धरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमातील आसनव्यवस्थेवरून कदम यांनी तटकरे यांचे मेहुणे अजय बिरवटकर यांना अपमानास्पद वागणूक दिली होती.