संजय शिसराटांच्या बंगल्यावर हल्ल्याचा प्रयत्न! मध्यरात्री तीनजण आले अन्..., घटना CCTV मध्ये कैद; पोलिसांनी मंत्र्याचा फोनही उचलला नाही
संजय शिरसाट यांनी या हल्ल्यासंदर्भात बोलताना पोलिसच उपलब्ध नव्हते असा आरोप केला असून संतापून थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आपण तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोलवाडी येथील बंगल्यावर गुरुवारी (12 नोव्हेंबर 2026) रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. तीन मद्यधुंद तरुणांनी शिरसाट यांच्या बंगल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सातारा पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे.
नेमकं काल रात्री झालं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शिरसाट यांच्या निवासस्थानाच्या मागील बाजूस काही तरुण मद्यपान करत होते. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांना तेथून जाण्यास सांगितले असता तरुणांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. तीन तरुण दुचाकीवरुन शिरसाट यांच्या बंगल्याच्या गेटवर आले. त्यांना सुरक्षारक्षकांनी रोखलं. यादरम्यान त्यांची आणि सुरक्षा रक्षकांची झटापट झाली. या वादादरम्यान नशेत असलेल्या मद्यधुंद तरुणांनी दारूच्या बाटल्या फोडून त्या बंगल्याच्या दिशेने भिरकावल्या. सुरक्षेत तैनत असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता झालेल्या झटापटीत एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे.
तरुणांनी दिली धमकी
सुरक्षारक्षकांनी अडवल्यानंतर या तरुणांनी त्यांनाच धमकी दिली. "अनेक ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) माझ्या खिशात आहेत, माझे कोणी काही करू शकत नाही," असं म्हणत हा तरुण अरेरावी करत होता.
शिरसाट संतापले
या घटनेसंदर्भात संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला आहे. स्वत: मंत्री असलेल्या शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील कायदा व सुव्यवस्थेवर आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. घटनेनंतर पोलीस आयुक्तांचा फोन बंद होता आणि एकही डीसीपी किंवा एसीपी दर्जाचा अधिकारी घटनास्थळी आला नाही, असा आरोप शिरसाट यांनी केला आहे.
मंत्र्याचा फोनही पोलिसांनी उचलला नाही
आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिरसाट यांच्यासारख्या अती महत्त्वाच्या व्यक्तीलाही स्थानिक पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क न झाल्याने शिरसाट यांनी रात्री बाराच्या सुमारास राज्याच्या पोलीस महासंचालकांना (DGP) फोन करून घटनेची माहिती दिली. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार
शहरात दिवसाढवळ्या खून आणि अमली पदार्थांची विक्री होत असताना पोलीस आयुक्तांना याचे गांभीर्य दिसत नसल्याची टीका करत, मुख्यमंत्र्यांकडे आयुक्तांची तक्रार करणार असल्याचे शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपला संताप व्यक्त करताना म्हटलं आहे. या प्रकरणात आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.