हिंगोली क्राईम : माणुसकीला काळीमा फासणारी आणि काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील वडद गावात घडली आहे. जिथे रक्ताच्या नात्यांनी एकमेकांना आधार द्यायला हवा, तिथे आज पाणी जीवावर बेतल आहे! सामायिक विहिरीच्या पाण्यावरून झालेल्या वादातून एका पोटच्या पुतण्याने आपल्याच काका आणि काकूचा अत्यंत निर्घृणपणे खून केला आहे. मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळानं आज थेट घरातील माणसांचेच जीव घ्यायला सुरुवात केली आहे का? असा सुन्न करणारा सवाल या घटनेने निर्माण केला आहे.
हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातील वडद गावावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या गावात कधी काळी गुण्यागोविंदाने नाती नांदत होती, त्याच मातीवर आज रक्ताचे पाट वाहिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्र्यंबक चोपडे आणि मंगलाबाई चोपडे असं मृत वृद्ध काका-काकूंचं नाव आहे. ज्या हातांनी या पुतण्याला लहानाचं मोठं केलं, त्याच हातांवर आज याच नराधम पुतण्याने- देवेंद्र चोपडेने वार केले.
यावर्षी मराठवाड्यात पावसाने अक्षरशः पाठ दिली आहे. डोळ्यांसमोर हिरवीगार पिके जळून खाक होत असताना बळीराजा हवालदिल झाला आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकरी दिवसरात्र एक करतोय, पाण्यासाठी वणवण फिरतोय. विहिरीत पाण्याचा ओलावा उरलेला नाही, आणि जो थोडाफार पाणीसाठा आहे, त्यावर हक्क सांगण्यासाठी आता थेट रक्तरंजित संघर्ष सुरू झाला आहे.
मृत त्र्यंबक चोपडे आणि आरोपी पुतण्या देवेंद्र चोपडे यांच्यात शेती सामायिक होती आणि शेतातच ती विहीर होती. ''''आठ दिवस तुम्ही पाणी द्या, आठ दिवस आम्ही देतो,'''' असा साधा नियम ठरला होता. पण पाण्याची एवढी मारामार होती की, ठरलेल्या वेळेत पाणी मिळाले नाही म्हणून पुतण्याचा संताप अनावर झाला. पण हा राग इतका भयानक असेल, की तो थेट जीवाशी खेळेल, याची कुणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती काका त्र्यंबक चोपडे आपल्या शेतात नेहमीप्रमाणे कामासाठी गेले होते. तिथेच आरोपी देवेंद्र पोहोचला. पाण्याचा हिशोब मागताना त्यांच्यात वाद झाला आणि बघता बघता नराधमाने आपल्याच काकावर चाकूने सपासप वार केले.
म्हातारपणात प्राणांची भीक मागणाऱ्या त्या हतबल काक्याचा थरकाप उडवत, देवेंद्रने त्यांना जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पाडले. काकाच्या रक्ताचे डाग पुसले गेले नाहीत, तोच हा पाशवी राक्षस पुढच्या कृत्यासाठी निघाला.काकाचा घात केल्यानंतर हा विकृत पुतण्या थांबला नाही. तो थेट काका त्र्यंबक यांच्या घरी पोहोचला. दुर्दैवाने घरातीस इतर मंडळी बाहेरगावी गेलेली असल्याने घरी काकू मंगलाबाई चोपडे एकट्याच होत्या. कसलाही विचार न करता, घरात घुसून त्या हतबल माऊलीवरही या नराधमाने धारदार शस्त्राने वार केले. घरात काम करत असलेल्या त्या काकूनेही तिथेच प्राण सोडले. एकाच घरातील दोन निष्पाप जीव पाण्यासाठी संपवले गेले.
या थरारक आणि हादरवून सोडणाऱ्या घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलिसांनी तातडीने धाव घेत मारेकरी पुतण्या देवेंद्र चोपडे याला बेड्या ठोकल्या आहेत. हत्येचा हा कट आणि पाण्याचा हा वाद पोलिसांच्या चौकशीत समोर येत आहे, पण या घटनेने संपूर्ण परिसराची मान लज्जेने खाली गेली आहे.
निसर्गाने हिंगोली आणि मराठवाड्याच्या वाट्याला दुष्काळ दिला, पण माणसांमधील उरलीसुरली दयामायाही या दुष्काळानं गिळून टाकलाय का? पाण्याचा एक थेंब पिकांना पुरवण्यासाठी जर पुतण्याला आपल्याच काका-काकूचा जीव घ्यावासा वाटत असेल, तर आपण कुठल्या समाजात चाललोय? हा केवळ दोन हत्यांचा प्रश्न नाही, तर हा आपल्या ढासळलेल्या मूल्यांचा आणि भीषण वास्तवाचा आरसा आहे. या घटनेनं संपूर्ण हिंगोली जिल्हा हादरून गेला.