पुण्यामध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे माजी विशेष कार्य अधिकारी आणि अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा जाहीर केल्याने भाजपा आणि शिंदेसेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. असतानाच दुसरीकडे मराठवाड्यामध्येही पदवीधरच्या रिंगणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. पुण्यात जसा भाजपाला शिंदेंच्या सेनेनं धक्का दिलाय तसाच प्रकार मराठवाड्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत झाला आहे. शिंदेसेनेचे नेते आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला डावलून थेट महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.
कोणाला जाहीर केला पाठिंबा?
अब्दुल सत्तार हे सत्ताधारी महायुतीमधील शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे आमदार असूनही त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील प्रचार सभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे उघडपणे समर्थन केले आहे. त्यामुळे एकीकडे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी पुन्हा सतीश चव्हाण यांना पाठिंबा दिला असताना दुसरीकडे अब्दुल सत्तारांनी मात्र शरद पवारांच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीचे मतदान करण्याचा आवाहन केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी सिल्लोडमध्ये मेळावा देखील घेतला.
सत्तार नेमकं काय म्हणाले?
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना प्रथम पसंतीचे मतदान करून विजयी करण्याचे आवाहन माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे. डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या प्रचारार्थ सिल्लोड येथील शिवसेना भवनात परभणीचे आमदार राहुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार बोलत होते. उच्चशिक्षित उमेदवार असलेले डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील हे पदवीधरांच्या समस्या आणि विविध अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असा विश्वास आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. डॉ. प्रतापसिंह पाटील यांना प्रथम पसंतीचे मतदान करून विजयी करण्याची जबाबदारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वीकारावी आणि त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
निवडणुकीमधील चुरस वाढली
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात एकूण 41 उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण आहेत. त्यांच्याविरोधात शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील उभे आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून दिलीप घुगेही रिंगणात आहेत. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट आणि ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे, महायुतीमध्ये असूनही अब्दुल सत्तार यांनी घेतलेल्या या वेगळ्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे 41 उमेदवार उभ्या असलेल्या या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.