उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्याला देण्यासाठी सांगून भारतीय जनता पार्टीकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एक ऑडिओ क्लिप ऐकवली. या ऑडिओ क्लिपमधील संवादाच्या आधारेच आपण आर्थिक व्यवहारासंदर्भात भाष्य केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या क्लिपमध्ये काय आहे? जरांगे काय म्हणाले जाणून घेऊयात...
क्लिपमध्ये आहे काय?
जरांगेंनी ऐकवलेली ही क्लिप भाजपच्या अंतर्गत मीटिंगची असल्याचा दावा करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आसपासची ही क्लिप असल्याचं सांगितलं जात असून यात एका महिलेचाही आवाज येत आहे. ही महिला भाजप आयटी सेलशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे. ही महिला हिंदीत बोलताना ऐकू येत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये, “जरांगे पाटील को ऑलरेडी 500 करोड रुपये श्रीकांत शिंदे के पास से पहुंच चुके हैं... अब जरांगे पाटील विधानसभा चुनाव में हमारे फायदे का रहेगा या नहीं, इसमें मेरा मत अलग है, कॅल्क्युलेशन अलग है... बाकी आप लोग जो सोचते हैं...” असं ही महिला बोलताना ऐकू येत आहे. याच ऑडिओ कॉलमध्ये जरांगे यांना 'मराठाद्रोही' दाखवण्याचा, त्यांच्याविरोधात प्रचार करण्याचा आणि “डॅमेज” करण्याचा उल्लेखही असल्याचे सांगितले जात आहे.
जरांगे काय म्हणाले?
ही ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत ऐकवून जरांगे पाटलांनी दावा केला की, भाजपमध्ये 'श्रीकांत शिंदेंमार्फत जरांगे यांना 500 कोटी पोहोचले” अशी कुजबुज सुरू असल्याचं म्हटलं आहे. “तुम्ही दिल्लीतील भाजप नेत्यांना सांगितलं का की मला 500 कोटी द्यायचेत आणि तुम्ही घेऊन मला दिलेत? श्रीकांत शिंदेंच्या हाताने मला पैसे पोहोचले का?” असा थेट सवाल मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेमधून एकनाथ शिंदेंना केला आहे. तसेच शिंदे यांनी पैसे दिले नसतील तर “भाजप तुम्हाला संपवतोय की तुम्ही मला संपवताय” याचा छडा लावा, असंही जरांगेंनी म्हटलं आहे. एवढ्यावरच न थांबता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शक्य असल्यास पंतप्रधान मोदी यांनी या षड्यंत्राची चौकशी करावी, असे आवाहनही जरांगेंनी केलं आहे.
भाजपाची पहिली प्रतिक्रिया
जरांगेंच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकारांशी बोलताना, या क्लिपची सत्यता तपासून पाहिली पाहिजे असं म्हटलं आहे. तसेच जरांगेच्या सुरक्षेसंदर्भातील योग्य तो निर्णय गृहखात्याकडून घेतला जाईल असंही बन यांनी म्हटलं आहे.
तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी जरांगेंनी या ऑडिओ क्लिपमधील नेत्यांची नावं जाहीर करावीत असं म्हटलं आहे.