नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदेंवर भाजपकडून आपल्या नावावर 500 कोटी रुपये घेतल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली. तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी जरांगे यांच्यावर बाप दाखव नाहीतर श्राद्ध घालण्याचं आव्हान दिलं.त्यामुळे जरांगे विरुद्ध रामदास कदम असा वाद सध्या पाहायला मिळतोय. बापही तुम्हीच दाखवा,श्राद्धही तुम्हीच घाला असं प्रत्युत्तर मनोज जरांगे यांनी दिलं आहे. मी बेईमान आहे की नाही हे उद्या 11 वाजता कळेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
बीडच्या नारायण गडावरील मनोज जरांगे पाटलांनी घेतलेल्या मेळाव्यानं राज्यात चांगलाच धुरळा उडालाय. या मेळाव्यात जरांगेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माझ्या नावावर भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा आरोप केल्यानं एकच खळबळ उडालीय. अंतरवालीत जरांगे यांचं 11 वं उपोषण झालं. या उपोषणादरम्यान शिंदेंनी आपल्या नावावर भाजपकडून 500 कोटी घेतल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचं जरांगे यांनी सांगितलंय. एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदेंनी भाजपकडून हे पैसे स्वीकारले आणि मला दिल्याच एकनाथ शिंदेंनी भाजप नेत्यांना सांगितलं असल्याचा आरोप देखील जरांगेंनी केला. आणि हे पैसे शिंदेंनी घेतले की नाही हे शिंदेंनी सांगावं असं आव्हान जरांगेंनी एकनाथ शिंदेंना दिलंय.
मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदेंवर 500 कोटी रुपये घेतल्याचा आरोप केल्यानंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम देखील मुंबईतील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आक्रमक झाले आणि त्यांनी जरांगे पाटलांवर हल्ला चढवत बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असं आव्हान जरांगेंना दिलंय. तसेच मराठा समाजाचा नेता झाल्यापासून जरांगेंची संपत्ती कुठे कुठे आहे याची चौकशी करा अशी मागणीही कदम यांनी केली. तसेच जरांगे बेईमान माणूस असल्याचं सांगत जरांगेंवर आरोपांच्या फटाक्यांचा बॉम्ब फोडलाय,
मग जरांगेंनी देखील रामदास कदम यांच्यावर टिकेचे बाण सोडले. बापही तुम्हीच दाखवा आणि श्राद्धही तुम्हीच घाला असं म्हणत जरांगे यांनी कदम यांच्यावर टीका केली. उद्या 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन श्राद्ध घालतो असं आव्हान जरांगेंनी कदमांना दिलं. एकनाथ शिंदे तुमचे दैवत असले तरी 1966 च्या आधी तुम्ही कोण होते.? असा सवाल देखील जरांगेंनी कदमांना केलाय. शिवाय मराठ्यांनी तुमच्यावर मतांचा पाऊस पाडल्यानं तुम्ही सत्तेत असल्याची आठवण जरांगेनी करून दिलीय. शिवाय 2029 ची निवडणूक दूर नसल्याचा इशारा जरांगेंनी कदमांना दिलाय.
मी काय विचारलं? मला 500 कोटी दिल्यात भाजपाची उच्च पातळीवर कुजबूज आहे. मी किती लांब हात टाकणार हे आता उद्या कळेल. उद्या मराठे प्रश्न विचारतील, सांग रे बेईमान, लाचार कोण आहे? माझ्याकडे चौकशी करायला काहीच नाही. मी जे उद्या सांगणार ते अती भयंकर आहे. त्यात दोन माजी उपमुख्यमंत्रीही आहेत असं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे. उगाच माझ्या वाटेला येऊ नका असा इशाराही त्यांनी दिला आहे. उद्या 11 वाजता श्राद्ध घालतो असंही त्यांनी म्हटलं आहे.