बीडच्या श्रृंगारवाडीत झी 24 तासच्या उत्सव बांधिलकीचा या कार्यक्रमात एका आजोबांच्या अश्रूंचा बांध फुटला. दुष्काळामुळे पाणीसंकट गहिरं बनलं नसून यामुळे नातीही दुरावली आहेत. गावात काम नसल्यानं अनेक जण बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांची जबाबदारी वृद्ध आजी आजोबांवर आली आहे. हेच सांगताना श्रुंगारवाडीतील आजोबांना अश्रू अनावर झाले.
दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्याचा झी 24 तासने संवेदनशील उपक्रम राबवला आहे. दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, प्रकाश आणि आपल्या माणसांसोबत सण साजरा करण्याचा काळ. मात्र, दुष्काळ, पाणीटंचाई आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात यंदा दिवाळीचा आनंद काहीसा हरवला होता. अशाच शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण फुलवण्यासाठी झी 24 तासने यंदाची दिवाळी थेट बळीराजाच्या दारी जाऊन साजरी केली.
‘उत्सव बांधिलकीचा – झी 24 तासची दिवाळी, बळीराजाच्या दारी’ या विशेष उपक्रमांतर्गत झी 24 तासची टीम बीड, सोलापूर, पाथरी आणि ऐतिहासिक सिंदखेड राजा अशा विविध भागांतील गावांमध्ये पोहोचली. केवळ शुभेच्छा देण्यासाठी नव्हे, तर शेतकरी कुटुंबांसोबत वेळ घालवण्यासाठी, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमाला मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांनीही उत्स्फूर्त सहभाग दिला. बीडमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी शेतकरी कुटुंबांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. हा संवाद साधला जात असताना एका आजोबांच्या डोळ्यात अश्रू तरळले. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी या आजोबांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना भावना अनावर झाल्या. यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबता थांबत नव्हते. तशाच भावूक अवस्थेत ते आपली व्यथा मांडत होते. त्यांची ही व्यथा सर्वांनाच भावूक करणारी आहे.
अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडेही बीड जिल्ह्यातील शृंगारवाडी इथं ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेताना भावूक झाले होते. त्यांनीयावेळी पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या आणि वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. तसेच मूल-बाळ-पती नसलेल्या एका वृद्ध महिलेलाही मदतीचा हात दिला आहे.