अलिबाग : वाहतूक कोंडीत अडकून चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रायगडच्या अलिबागमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. फक्त 35 मिनिटांच्या प्रवासासाठी 4 तास लागले. या चिमुरड्याचे आई वडिल वाहतूक कोंडीतून रुग्णवाहिका पुढे जावी यासाठी आक्रोश करत होते. मात्र, रुग्णवाहिकेला वाहनांच्या प्रचंड गर्दीतून पुढे जाताच आले नाही.
अलिबाग रोहा मार्गावर वाहतूक कोंडीत झालेल्या चिमुरड्याच्या मृत्यू प्रकरणी आता स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका या चिमुकल्याला बसला आहे. एक निप्पाप बालकाचा मृत्यू झाला आहे. आई वडिलावंर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
आरांश ठाकूर असे मृत मुलाचे नाव आहे. आरांश फक्त 18 महिन्यांचा आहे. फुगा गिळल्यामुळे आरांशची प्रकृती बिघडली. या 18 महिन्याच्या बाळाला उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात येत होते. परंतु वाहतूक कोंडीमुळे तो रुग्णालयात पोहोचू शकला नाही आणि भर रस्त्यातच त्याला निघालेला मृत्यूने गाठले. या दुर्दैवी घटनेला जबाबदार असलेल्या संबंधितांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
मृत आरांश हा अलिबाग तालुक्यातील बामणगाव येथे राहणारे सुशील ठाकूर यांचा मुलगा आहे. 17 नोव्हेंबरला दुपारी अंगणार खेळत असताना आरांशने फुगा गिळला. फुगा थेट त्याच्या घशात अडकला. आरांशचा श्वास गुदमरला. मुलाची गंभीर अवस्था पाहून घाबरलेल्या पालकांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला तातडीने रुग्णवाहिका बोलावली आणि त्यासा अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचा निर्णय घेतला.
तात्काळ रुगण्वाहिका घराबाहेर दाखल झाली. आरांशच्या घरापासून ग्रामीण रुग्णालय फक्त 35 मिनिटांवर आहे. मात्र, याच 35 मिनिटांच्या प्रवासासाठी 4 तास लागले. अलिबाग दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या भीषण वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका पूर्णपणे अडकली होती. रुग्णवाहिकेचा सायरन सतत मोठमोठ्याने वाजत होता. पण, वाहनांची इतकी गर्दी होती रुग्णावाहिकेला पुढे जाण्यासाठी जागाच मिळत नव्हती. आरांशचे आईवडिल रस्त्यावर उतरुन वाहनांना रस्ता देण्याचे विनंती करत होते. अखेरीस रुग्णालयात पोहचण्याआधी वाटेतच आरांशचा दुर्दैवी मृत्यू झाला. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी येथे कोणतीही यंत्रणा नाही. वाहनांना बाजूला सरकण्यास जागा नसल्याने रुग्णवाहिका जागची हलू शकली नाही. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आरांशचा मृत्यू झाल्याचा संताप स्थानिकांनी व्यक्त केला आहे. बालकाच्या मृत्यू प्रकरणी स्थानिक आक्रमक झाले असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
या घटनेनंतर आरांशच्या आईने सगळा घटनाक्रम सांगितला. आरांशची आई त्याला आपल्या गाडीवर घेऊन डॉक्टरकडे निघाली. रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे पुढे जाताच येत नव्हते. अखेर बाळाला घेऊन ती माऊली गाडी तिथंच टाकून ती अलीबागच्या दिशेने धावू लागली.त्यात देखील खूप अडथळे येत होते. अखेर एका ओळखीच्या व्यक्तीने तिला आपल्या गाडीवर घेऊन दवाखान्या पर्यंत नेले. परंतु तो पर्यंत उशीर झाला होता. अखेर वाहतूक कोंडीमुळे आरांश याला आपला जीव गमवावा लागला. हा प्रश्न केवळ आमचाच नाही इतर कुणाच्याही बाबतीत असा प्रकार घडू शकतो, प्रशासनाने यावर वेळीच उपाय योजना करायला हवी अशी अपेक्षा आरांश याचे वडील सुशील ठाकूर यांनी व्यक्त केली.