'मोदी, शाह वैचारिक दारिद्र्याचे मुकुटमणी, ठाकरेंची बदनामी करून स्वतःची खाजवत...', UBT चा पलटवार; 'गुजरातच्या स्मशानभूमीत दोन-दोन दिवस...'
"शहा म्हणतात, सततच्या पराभवाने काँग्रेस पक्ष हा वैफल्यग्रस्त झाला आहे. शहा यांचे हे विधान त्यांच्याच वैफल्यतेचे लक्षण आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. अमित शाहांवर निशाणा साधताना त्यांच्या पुणे दौऱ्याचा संदर्भ देण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपलब्ध नसल्याने अजित पवारांची बोलणं व्हायचं असं विधान केल्याच्या मुद्द्यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेनं टीकास्र सोडलं आहे. अमित शाहांना वैफल्यग्रस्त म्हणत निशाणा साधण्यात आला आहे. "पिंपरीतील एका कार्यक्रमात शहा म्हणाले, ‘‘बदनामी करून सत्ता मिळणे अशक्य आहे,’’ हे असे विधान करताना शहा यांनी समोर आरसा ठेवायला हवा होता.2014 ची लोकसभा निवडणूक पंतप्रधान मोदी यांनी मनमोहन सिंग, सोनिया गांधी व काँग्रेसची बदनामी करूनच जिंकली होती. खोटे बोलणे, अफवा पसरवणे, एखाद्याची बदनामी करणे हीच मोदी-शहांची हत्यारे आहेत. त्याच हत्यारांचा वापर ते करतात. अजित पवारांची खोटी स्तुती करताना शहांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बदनामी केली. ‘कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी काहीच काम केले नाही व फक्त अजित पवार तेवढे काम करत होते,’ हे शहा यांचे विधान म्हणजे त्यांची पोटदुखी आणि जळफळाट आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेले कार्य जागतिक स्तरावर नोंदवले गेले," असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
हा भाजपवाल्यांचा जुनाच धंदा
"उत्तर प्रदेशात ‘कोरोना’तील मृतांची शेकडो प्रेते गंगेत फेकून मुख्यमंत्री योगी ‘कर्तव्यतत्परता’ दाखवत होते. गुजरातच्या स्मशानभूमीत दोन-दोन दिवस अंत्यविधीसाठी रांगा लागल्या होत्या तेव्हा हे मोदी-शहा ‘लॉक डाऊन’ करून एकप्रकारे भूमिगत झाले होते. महाराष्ट्र वाचवला तो तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी, पण त्यांची बदनामी करून स्वतःची खाजवत बसणे हा भाजपवाल्यांचा जुनाच धंदा आहे. बदनामी करूनच भाजपने सत्तेचे इमले उभे केले. ते आता कोसळण्याच्या स्थितीत आले असताना दुसऱ्यांना सल्ले देत आहेत," अशा शब्दांमध्ये ठाकरेंच्या पक्षाचं मुखपत्र अशी ओळख असलेल्या 'सामना'मधून अमित शाहांच्या विधानाचा समाचार घेण्यात आला आहे.
शहा गच्च भरलेल्या पोटावरून हात फिरवत पुण्यात...
"अमित शहा, मोदी वगैरे कंपू वैचारिक दारिद्र्याचे मुकुटमणी आहेत. ते पूर्णपणे व्यापारी वृत्तीचे आहेत. पैसे मिळवण्यासाठी देशाची सार्वजनिक संपत्ती त्यांनी आपल्या लाडक्या उद्योगपतीला विकली. शहा गच्च भरलेल्या पोटावरून हात फिरवत पुण्यात सांगतात, ‘‘काँग्रेसने त्यांच्या काळात 12 लाख कोटींचे घोटाळे केले आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे जनतेने त्यांना सत्तेबाहेर काढले.’’ शहा यांचे म्हणणे एकवेळ मान्य करू, पण ज्यांच्या नावावर हे बहुसंख्य घोटाळे आहेत ते सर्व ‘शतरत्न’ शहांच्याच अंगाखांद्यावर, मांडीवर खेळत आहेत. भाजपची एक वॉशिंग मशीन आहे त्यात सर्व भ्रष्ट व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना टाकले जाते व त्यांना क्लीन चिट देऊन भाजपमध्ये प्रवेश दिला जातो. यावर शहांचे काय म्हणणे आहे?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.
भ्रष्टाचार उघड करणे ही देशाचीही बदनामी
"सत्य असे आहे की, इंग्रजांनी दीडशे वर्षांत भारताची जितकी लूट केली नसेल त्यापेक्षा जास्त लूट मोदी-शहांच्या राजवटीने मागच्या दहा वर्षांत केली आहे. सर्वत्र भ्रष्टाचाराचेच साम्राज्य. अयोध्येतील राममंदिराच्या देणग्या आणि दानपेटय़ा लुटण्यापर्यंत यांची मजल गेली. पुन्हा त्याच भ्रष्ट हातांनी हे लोक अयोध्येत दीपोत्सव साजरा करतात. संपूर्ण मुंबई यांनी अदानी, कंबोज, आनंद पंडित या तीन बिल्डरांच्या घशात घातली. असे लाखो कोटी रुपये गिळणारे हे लोक अजूनही काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर बोलतात हे विडंबन आहे. भाजपच्या ताब्यात आताच मुंबई महापालिका आली, पण अल्पकाळातच पालिकेत भ्रष्टाचाराचा डोंगर यांनी निर्माण केला. पुन्हा त्यावर बोलले की, यांची बदनामी होतेच व ते म्हणतात, आमचा भ्रष्टाचार उघड करणे ही देशाचीही बदनामी आहे," असं अग्रलेखात म्हटलं आहे.
शहांची ती ‘पोज’ पाहून अनेकांना लॉरेन्स बिष्णोई आठवला
"शहा हे पुण्यातील भारत फोर्ज कंपनीत गेले. तेथे बनत असलेल्या रायफलची पाहणी केली. त्यांनी बंदूक हातात घेऊन नेम धरला. शहांची ती ‘पोज’ पाहून अनेकांना लॉरेन्स बिष्णोई आठवला. कारण देशाची स्थिती शहांनी नेमकी अशीच करून ठेवली आहे," असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
शहांचे वैफल्य उफाळून आले
"शहा म्हणतात, सततच्या पराभवाने काँग्रेस पक्ष हा वैफल्यग्रस्त झाला आहे. शहा यांचे हे विधान त्यांच्याच वैफल्यतेचे लक्षण आहे. राहुल गांधींनी शहा टोळीची ‘व्होट चोरी’ पकडून 2029 च्या विजयाला ब्रेक लावल्याने शहांचे वैफल्य उफाळून आले आहे. पुण्यातील त्यांचा वावर तसाच वैफल्यग्रस्त मंत्र्यांचा होता. अशा माणसाच्या हाती देशाची सूत्रे असणे धोकादायक आहे," असं अग्रलेखाच्या शेवटी म्हटलं आहे.