महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी बुधवारी केलेल्या एका विधानावरुन भारतीय जनता पार्टीकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राज यांनी पुढच्या दोन-चार महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होईल असं सूचक विधान करताना, पुढील काही महिन्यात अख्खा देश रस्त्यावर आला तरी आश्चर्य वाटणार नाही असंही म्हटलं आहे. आगामी काळात ज्या गोष्टी होतील त्या सरकारला झेपणार नाही. मधे एक असा काळ येईल जेव्हा देशाला पंतप्रधान नसेल असंही राज यांनी आवर्जून नमूद केलं. नीट पेपरफुटी आंदोलन, निवडणूक आयोगाचं आंदोलन झालं. जे बाहेर रस्त्यावर आले तो प्रत्यकेणज नीटचा पेपर सोडवून आला नव्हता. पण मनात काही ना काहीतरी राग आहे, तो बाहेर काढण्यासाठी मंच मिळाला असं त्यांनी म्हटलं. याच वेळी त्यांनी रेजीम चेंज म्हणजेच राजवट उलथवण्यासंदर्भातही भाष्य केलं असून यावरुन आता भाजपाने त्यांना सुनावलं आहे.
राज नेमकं काय म्हणाले?
"बदल हा गरजेचा असतो हाफ यांची फुल पँट नाही का झाली? त्यांना हवा असलेला निकाल त्यांना मिळतो. सुप्रीम कोर्टाने विचार केला पाहिजे आपण काय प्रकारचे निर्णय देत आहोत. कुठल्या स्वायत्त संस्था राहिल्या आहेत का? पत्रकारिता तरी राहिली आहे का? रेजीम चेंज हे मोहन भागवंताच्या हातात थोडी आहे? ते लोकांच्या जनतेच्या हातात आहे. 2014 मध्ये आलेली सत्ता ही नरेंद्र मोदींमुळे आलेली आहे. आरएसएसमुळे आलेली नाही. रेजीम चेंज करायचा असेल तर जनता आणि मोदी पाहतील," असा खोचक टोला राज यांनी भारतीय जनता पार्टीची मातृक संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लगावला. दसऱ्यानिमित्त नागपुरमधील मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी रेजीम चेंजसंदर्भात केलेल्या विधानावरुन राज यांनी संघाचा समाचार घेतल्याचं दिसून आलं.
भाजपाने साधला निशाणा
मात्र आता याच टीकेवरुन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी राज यांच्यावर निशाणा साधला आहे. "उद्धव ठाकरेंपाठोपाठ आता राज ठाकरेंनाही ‘रेजीम चेंज’चे डोहाळे लागले आहेत. राहुल गांधींची तर सत्ताबदलाची स्वप्नं जुनीच आहेत!" असं उपाध्ये यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच, "दोन आंदोलनं झाली, काही मुलं रस्त्यावर उतरली की लगेच यांना देशात सत्तांतराची स्वप्नं पडू लागतात. यांची ही अवस्था पाहिली की मराठीतली एक म्हण तंतोतंत आठवते- “मुंगीला मिळाला गहू, कुठे नेऊ आणि कुठे ठेवू!” म्हणजे छोट्याशा गोष्टीने हुरळून जाणे, जग जिंकल्याचा आव आणणे. पण यांच्या कांगाव्याने वास्तव बदलत नाही! इतर राज्यांतील निवडणुका असोत किंवा विद्यापीठांच्या निवडणुका, आजचा युवा विकासाच्या बाजूने उभा आहे. त्याला घोषणाबाजी नको, तर विकास हवा आहे; अराजकता नको, तर प्रगती हवी आहे," असं केशव उपाध्येंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या ‘Regime Change’च्या चर्चेवर आधारित पोस्ट. उद्धव ठाकरेंपाठोपाठ आता राज ठाकरेंनाही ‘Regime Change’ चे डोहाळे लागले आहेत. राहुल गांधींची तर सत्ताबदलाची स्वप्नं जुनीच आहेत! एखाद आंदोलनं झाल, काही मुलं रस्त्यावर उतरली की लगेच यांना देशात सत्तांतराची स्वप्नं पडू लागतात. यांची ही अवस्था पाहिली की मराठीतली एक म्हण तंतोतंत आठवते, “मुंगीला मिळाला गहू, कुठे नेऊ आणि कुठे ठेवू!” म्हणजे छोट्याशा गोष्टीने हुरळून जाणे, जग जिंकल्याचा आव आणणे. पण यांच्या कांगाव्याने वास्तव बदलत नाही! इतर राज्यांतील निवडणुका असोत किंवा विद्यापीठांच्या निवडणुका, आजचा युवा विकासाच्या बाजूने उभा आहे. त्याला घोषणाबाजी नको, तर विकास हवा आहे; अराजकता नको, तर प्रगती हवी आहे! तुम्ही कितीही म्हणत रहा ‘Regime Change’, पण देशातील युवा पुन्हा एकदा म्हणेल, ‘मोदीजी, Regime Once Again!’ @narendramodi @Dev_Fadnavis @RaviDadaChavan #RegimeChange #ModiOnceAgain #NarendraModi #UddhavThackeray #RajThackeray #RahulGandhi #YouthForDevelopment
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 22, 2026
पोस्टच्या शेवटी, "तुम्ही कितीही म्हणत रहा ‘रेजीम चेंज’, पण देशातील युवा पुन्हा एकदा म्हणेल ‘मोदींजी रेजीम वन्स अगेन’" असा विश्वास उपाध्ये यांनी व्यक्त केला आहे.