मध्य रेल्वे तसेच हार्बर रेल्वेच्या स्थानकांवर बुधवारी भाऊबीजेच्या दिवशी चक्क भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मराठी सण साजरा केला जात असतानाच दुसरीकडे रेल्वे प्रशानसाने उद्घोषणा बंद ठेऊन चक्क भोजपुरी गाणी वाजवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनेक स्थानकांवर हा प्रकार पाहायला मिळाला असून यावर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच महाराष्ट्र, नवनिर्माण सेनेनं आक्षेप घेतला आहे. सानपाडा, वडाळा आणि आंबिवली स्थानकांवर हा प्रकार पाहायला मिळाला.
स्थानिक नगरसेविकेने घेतला आक्षेप
वडाळा रेल्वे स्थानकावर छठपूजेच्या पार्श्वभूमीवर नियमित रेल्वे उद्घोषणा बंद करून मोठ्या आवाजात छठपूजेची गाणी वाजवली जात असल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तेथील ठाकरे गटाच्या नगरसेविका माधुरी मांजरेकर यांनी आक्षेप घेत तेथील स्टेशन मास्तरांची भेट घेतली आणि जाब विचारला. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी गाड्यांचे आगमन-प्रस्थान आणि महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी उद्घोषणा असतात. मात्र, धार्मिक गाणी वाजवण्यासाठी या उद्घोषणा थांबवणे योग्य आहे का, असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित केला जात आहे.
रेल्वेच्या घोषणा बंद करुन वाजवली गाणी
मध्य रेल्वेच्या मार्गावर मुंबईची लाइफलाइन असलेल्या ट्रेन दर दोन मिनिटाला सुटते. यासंदर्भातील उद्घोषणा रेल्वे स्थानकांवर होते. मात्र या उद्घोषणा दोन तास बंद ठेवून छट पुजेसंदर्भातील गाणी वाजवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक प्रवाशांनी समाजमाध्यमांवर आक्षेप नोंदवला आहे. माधुरी मांजरेकरांनी थेट स्टेशन मास्तरांची गाठ घेऊन विचारणा केली असता वरुन आदेश असल्याचं सांगितलं. लोकल कधी येते याबद्दल मराठी, हिंदी आणि इंग्रजीत होणाऱ्या घोषणा थांबवण्यात आल्या होत्या. पुढील तीन दिवस अशी गाणी वाजवण्यास आम्हाला सांगितल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता यासंदर्भात आक्षेप नोंदवला जात आहे. छट पुजेची गाणी वाजवली जात होती तर काल भाऊबीज होती त्याची गाणी का वाजवली गेली नाही अशी विचारणाही सोशल मीडियावरुन केली जात आहे. धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली रेल्वे स्थानकांचा वापर करण्यावरही नाराजी व्यक्त होत आहे.
भाजपाने कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र?
ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या प्रकारावरुन कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. "हे आपल्या महाराष्ट्रासाठी दुर्देवी आहे. या लोकांनी 2022 ला बाळासाहेबांचे विचार घेऊन दुकाना मांडलंय त्यांनी आता कानात रुई घातली आहे. भाजपा कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र असे विचारायचे ते आता विचारायचे पण नाही. महाराष्ट्र उत्तर प्रदेश, बिहारच्या पुढे नेऊन ठेवला. आपण युपी, बिहारची गाणी ऐकली पाहिजे ती सुद्धा भसाड्या आवाजात. अजूनही मराठी, गुजराती, मरावाडी माणसांना कळत नाहीये. जातीवाद, धर्मवाद करुन संपूर्ण हिंदुस्तान वेडा करुन टाकणार आहे," अशी टीका पेडणेकरांनी केली.
"वरुन आदेश म्हणजे कुठून? पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांपेक्षा वर कोण असेल? हे निवडून आलेले लोक कसं काय असं करु शकतात? बाबासाहेबांचं संविधान बदलणार असं जे आम्ही म्हणतोय त्याची ही सुरुवात आहे," असं पेडणेकर म्हणाल्या.