मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन मराठी विरुद्ध अमराठी वादाला पुन्हा नवी उकळी मिळालेली असतानाच मध्य रेल्वेने मात्र या निर्णयाचं समर्थन केलं आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत रेल्वेची भूमिका स्पष्ट केली.
नवी सूचना नाही
"आपण या आगोदर देखील संदेश दिले आहेत. यात दोन परिपत्रक आहेत. जनतेच्या जागृतीसाठी संदेश प्रकाशित करतो. रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने त्यांना आवश्यक असलेली माहिती, गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार याची माहिती पहिल्या प्रायोरिटीवर असते. त्यानंतर इतर माहिती जनतेच्या हिताच्या दृष्टीने दिली जाते. कोणतंही नवीन परिपत्रक किंवा वेगळी सूचना देण्यात आलेली नाही," असं स्वप्नील निला यांनी स्पष्ट केलं आहे.
एक्सप्रेस थांबत नाही तिथेही गाणी का लावली?
सानपाडा वगैरे ठिकाणी एक्सप्रेस थांबतच नाहीत मग तिथे ही भोजपुरी गाणी का लावण्यात आली? असा प्रश्न स्वप्नील निला यांना विचारण्यात आला असता त्यांनी, "प्राथमिक दृष्टीकोनातून आपल्याकडे येणारे प्रवासी बाकी स्थानकावरुन या स्थानकांवर जाण्यासाठी लोकल पकडतात. ज्या स्थानकांवर या गाड्या चालवल्या जात आहे तिथेच या घोषणा करण्याच्या सूचना आहे. यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, कल्याण, ठाणेसारख्या मुख्य स्थानकांचा यामध्ये समावेश आहे," असं स्पष्ट केलं आहे.
वारंवार गाणं वाजत होतं यावर काय म्हणाले?
वारंवार हे गाणं वाजत होतं असा दावा केला जात असल्यासंदर्भात बोलताना, "एकदाच वाजलं आणि संपलं. ते दोनदा तीनदा वाजलं आणि संपलं. आता हे खेचत बसले आहेत. मर्यादित काळ वाजवलं. केवळ महाराष्ट्र, मुंबई आणि मध्य रेल्वेवर नाही दरवर्षी भारतभर रेल्वेकडून केलं जातं. दरवर्षी हे होतं," असं स्वप्नील निला म्हणाले. तसेच उद्घोषणा थांबून गाणं वाजवण्यात आलं नाही किंवा या गाण्यासंदर्भात आपल्याकडे कोणी तक्रारही केली नाही असं स्वप्नील नीला यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र गीतावरुनही बोलले
"महाराष्ट्र गीत महाराष्ट्रात वाजवणार ना? एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या जागेवरुन लोक महाराष्ट्रात येत असतील तर आपण ते पण वाजवू. जे कोणी हा मुद्दा काढत आहेत ते वर वरचे बोलायचा प्रयत्न करत आहेत. फक्त मला सांगा कुठल्या ठिकाणाहून एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येतात. त्यांच्यासाठीही वाजवू," असंही मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं.
रोज किती लोक जातात?
"छट पुजेसाठी आपल्याकडून 60 ते 70 हजार लोक जात आहेत. साधारण जाण्याचा कालावधी दिवाळी आणि छटदरम्यान असतो. आपण ज्या स्पेशल गाड्या चालवतो त्या दिवाळी आणि छट दरम्यान चालवल्या जातात. महाराष्ट्रासाठी 298 स्पेशल गाड्या चालवल्या आहेत. नॉर्मल काळात हा नंबर 30 ते 35 हजारांचा असतो," असं स्वप्नील नीला यांनी सांगितलं.