कर्जत तालुक्यातील टोरेंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचा आरोप विरोधकांसह पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. त्यामुळं प्रकल्पाला वाढता विरोध बघता सरकारसह सत्ताधारी पक्षाचे नेते मैदानात उतरले आहेत. या प्रकल्पासाठी पर्यायी जागेची निवड व्हावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान या प्रकल्पासाठी कर्जतचीच निवड का करण्यात आली हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.
"पंप स्टोरेज कुठेही करता येत नाही. त्यासाठी ज्या फिजिबल साईट्स शोधण्यात आल्या आहेत. त्यात वेस्टर्न साईट्सच्या जास्त फिजीबल आहेत. केंद्र सरकारनेही पंप स्टोरेज प्रकल्पाला हिरव्या प्रकल्पात गणलं आहे. त्यामुळे पंप स्टोरेजचं आयुषमान पाहतो तेव्हा त्यात ते जास्त पर्यावरणपूरक होतात. त्यात ते जास्त कार्बन सिक्वेस्ट्रेशनचं काम करतात. म्हणून हे ग्रीन प्रकल्प आहे. याचा योग्य अभ्यास केला, समजून घेतलं तर याला होणारा विरोध अनाठायी आणि राजकीय आहे हे लक्षात येईल".
पुढे ते म्हणाले की, "काही लोकांचे काही मुद्दे असू शकतात. ते मुद्दे तसंच ग्रामस्थांचं म्हणणंही ऐकून घेण्यास तयार आहोत. कोणी जर आम्हाला पटवून दिलं की, यापेक्षा चांगलं तंत्रज्ञान आहे, त्यामुळे अधिक चांगलं आणि पर्यावरणपूरक काम करता येईल. तर तेही सरकार ऐकून गुंतवणूकदारांना सांगण्यास तयार आहे. पर्यावरणाच्या हिताच्या प्रकल्पाला आरे कारशेडमध्येही असाच विरोध झाला होता. शेवटी सुप्रीम कोर्टाने सांगितलं की, जी झाडे तोडली जात आहेत ती त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ते कार्बन सिक्वेस्ट्रेशनचं करेल तेवढं 'मेट्रो 3' 80 दिवसांच्या फेऱ्यात करेल असं सांगत मान्यता दिली होती. तसंच हे आहे, पण ज्यांन राजकारण करायचं आहे ते करत राहतील".
"जो पंप स्टोरेज प्रकल्प आहे तो पर्यावरणपूरक आहे. आपल्याकडे सोलर आणि विंड या दोन पॉवर आपण जनरेट करतो. पण या दोन पॉवर आपल्याला 24 तास मिळत नाही. पाच वाजल्यानंतर सोलर मिळत नाही, हवा नसेल तर विंड मिळत नाही. यामुळे ग्रीडवर त्याचा परिणाम होतो. 24*7 तास आपल्याला नवीकरणीय ऊर्जा देता येत नाही. जगात आज सोलर आणि विंड या पॉवरला बॅलेन्स करण्यासाठी आणि ग्रीड स्टॅबिलाइज करुन 24 तास पॉवर देण्यासाठी पंप स्टोरेज ही पद्धत वापरली जाते. पंप स्टोरेजमुळे पीक अवरमध्ये पूर्णपणे शुद्ध, रिन्यूएबल पॉवर कोणतंही प्रदूषण न करता उपलब्ध होत असते," असं ते म्हणाले आहेत.
पुढे त्यांनी सांगितलं की, "आपण जर या प्रकल्पाचा विचार केला तर 3 हजार मेगावॅटचा प्रकल्प आहे. 3 हजार मेगावॅट कोळशाची वीज जेव्हा तयार होते त्यावेळी त्या वीजेने जे प्रदूषण तयार होतं ते प्रदूषण कमी करायचं असेल तर 28 कोटी झाडं लागतात. आपण जर पंप स्टोरेजला विरोध केला तर कोळशाचीच वीज वापरावी लागेल. ती वीज वापरली तर आपण जे प्रदूषण करु त्यासाठी 28 कोटी झाडं लागावी लागतील जे अशक्य आहे. या प्रकल्पात 90 हजार झाडं लावली जात आहेत. जेवढी जागा घेतली त्याच्या दुप्पट जागा वनविभागाला देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त 60 हजार झाडं प्रकल्पाच्या साईटवर लावली जाणार आहेत".
"जे वेगवेगळे बॅटरी स्टोरेज प्रकल्प आहेत, त्यात 25 वर्ष आयुषमान असतं. सर्व बॅटरी चीनमधून आणाव्या लागतात. पंप स्टोरेजचं आयुषमान 80 वर्ष असतं आणि पूर्णपणे हे तंत्रज्ञान भारतात तयार होतं. त्यासाठी चीनची आवश्यकता नाही. हा पर्यावरणपूरक प्रकल्प आहे. ज्यातून 100 वर्षासाठी पर्यावरणाची हानी टाळत आहोत. आता जी हानी दिसत आहे, त्याहून कितीतरी हजार पट आपण या प्रकल्पातून टाळणार आहोत," असा दावा त्यांनी केला आहे.