राज्यातील 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं सरकार येणार होतं, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नाना पटोले यांनी केला आहे. यात काँग्रेसच्या 75 उमेदवारांसह महाविकास आघाडीचे 160 उमेदवार निवडून येणार असल्याचं महत्वपूर्ण अहवाल सरकारी यंत्रणांनी दिला असल्याचं ते म्हणाले आहेत. यासंदर्भातील महत्त्वपूर्ण अहवाल 'इंटेलिजन्स ब्युरो'ने सरकार आणि विरोधी पक्षांना दिला होता, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे. ते अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या वाडेगाव येथे काँग्रेस नेते प्रमोद डोंगरे यांनी आयोजित केलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सभेत बोलत होते.
दरम्यान, मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाचनंतर वाढवलेल्या मतदानाच्या बोगस आकडेवारीतून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यापासून रोखण्याचा कट शिजल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 160 आमदार निवडून येतील, असा अहवाल सरकारी यंत्रणांनी दिला होता. मात्र, मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाचनंतर वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारीतून महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नाना पटोले यांनी केला आहे.
दरम्यान याआधी नाना पटोले यांनी आगामी हिवाळी अधिवेशनाच्या खर्चात 42 कोटी रुपयांची वाढ झाल्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने तीन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. यासंदर्भात सरकारला पत्रही देण्यात आले होते. मात्र, सरकारला दुष्काळावर चर्चा करण्यात रस नसून केवळ पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्यासाठीच अधिवेशन घ्यायचे आहे, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला.
विशेष अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडता आल्या नसत्या, त्यामुळे आता पुरवणी मागण्यांसाठीच सरकार अधिवेशन घेत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. अर्थसंकल्पापेक्षा अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या आल्यास सरकारवर अतिरिक्त आर्थिक भार पडतो. यावरून सरकारची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचा टोला त्यांनी लगावला.
हा केवळ 42 कोटी रुपयांच्या खर्चाचा विषय नसून जनतेच्या प्रश्नांचा विषय आहे, असे पटोले म्हणाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या मंजूर करून घेऊन आठवडाभरात अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा दावाही त्यांनी केला. हिवाळी अधिवेशन दोन महिने चालणे शक्य नसले, तरी किमान एक महिना चालले पाहिजे. मात्र, सरकार जनतेच्या प्रश्नांपासून हिवाळी अधिवेशनात पळ काढणार असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्रात फूट पाडण्यासाठी वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. जरांगे पाटील यांच्याशी संबंधित कथित ऑडिओ क्लिपच्या प्रकरणावरून त्यांनी राज्य सरकार आणि भाजपवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना, महाराष्ट्राला लुटण्यासाठीच हे नेते बसले आहेत का, असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला. या प्रकरणामुळे महाराष्ट्राची बदनामी झाल्याचा आरोप करत त्यांनी राज्य सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी केली.
दरम्यान, सरकारवरच मतचोरीचे आरोप होत असताना त्याच सरकारकडून चौकशी केली जाणार असेल, तर ती निष्पक्ष कशी होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाचा मुख्य सूत्रधार भाजप असल्याचा आरोपही पटोले यांनी केला
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना, दुष्काळ निवारणासाठी ३५ हजार कोटी रुपये खर्च करण्याच्या घोषणेतून शेतकरी आणि गरीब जनतेच्या पदरी पुन्हा निराशाच पडणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारने या सर्व मुद्द्यांवर जनतेसमोर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.याशिवाय, केंद्र आणि राज्य सरकारे जनतेच्या मतांवर नव्हे, तर निवडणूक आयोगाच्या कृपेने सत्तेत आल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. ज्ञानेश कुमार आणि त्यांचे पूर्वसुरी राजीव कुमार या दोघांनी लोकशाहीची हत्या केल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली