शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारसंघांच्या पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अशाप्रकारे अचानक भूमिक बदलल्याने ज्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडी उभी आहे त्या काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या मनातील सर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत पेजवरुन व्यक्त करण्यात आली आहे. कशाप्रकारे अवघ्या काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसने शरद पवारांचा राज्यसभेवर निवडून देण्यासाठी मदत केली होती याची आठवणच काँग्रेसने करुन दिली आहे. तेव्हा कशाप्रकारे घडामोडी घडल्या आणि आता काय सुरु आहे याचा संदर्भ या पोस्टमध्ये देण्यात आला आहे.
शरद पवारांच्या पाठीशी उभी राहिली काँग्रेस
राष्ट्रवादी महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टवरुन शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा एक फोटो पोस्ट करण्यात आला असून या फोटोला दिलेल्या कॅप्शनमधून सुप्रिया सुळेंनी कशाप्रकारे राज्यसभेवर शरद पवारांना निवडून देण्यासाठी काँग्रेसची मदत मागितली होती, त्यावेळी संख्याबळाचं गणित कसं होतं याची आठवण करुन दिली आहे. "शरद पवार साहेबांना वयाच्या 85 व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता," असं पोस्टच्या सुरुवातीला म्हटलं आहे.
काँग्रेसने स्वत:च्या जागेवरील दावा बाजूला ठेवत...
"मार्च 2026 मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे 10 आमदार होते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 36 मतांची आवश्यकता होती. काँग्रेसकडे 16, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे 20 आमदार होते. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार साहेबांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढे वेढे न घेता सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीने एकमताने त्यांची उमेदवारी निश्चित केली," असं काँग्रेसने म्हटलं आहे.
आणि आता काय?
पोस्टमध्ये पुढे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काय केलं असा सवाल विचारण्यात आला आहे. "आणि आता काय? परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर तेच शरद पवार साहेब, सुप्रीया सुळे ताई आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत," असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.