दिवाळी Insta रीलची हौस पडली महागात; 21 वर्षीय तरुणाला 74 टाके! ही चूक तुम्ही करु नका, डॉक्टरांचं आवाहन
दिवाळीमध्ये तुम्ही अनेक अपघातांबद्दल ऐकलं असेल, सोशल मीडियावर पाहिलं असेल किंवा पेपरमध्ये वाचलं असेल. मात्र त्याहून अगदी विचित्र प्रकार समोर आला असून या अपघातामध्ये एकजण गंभीर जखमी झालाय. त्याबद्दलच...
दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागल्याच्या घटना घडल्याचं यावर्षी दिसून आलं आहे. मुंबईत तर आगीच्या 500 हून घटना घडल्या आहेत. त्यातही आग लागण्याचं मुख्य कारण फटके ठरलं असून काही ठिकाणी लोक जखमीही झाले आहेत. असाच एक विचित्र प्रकार वसई-विरारमधून समोर आला आहे. दिवाळीसाठी सोशल मीडियावर 'रील' बनवण्यासाठी व्हिडीओ शूट करताना हातात फटाका फोडण्याच्या नादात एक 21 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेत हा मुलगा एवढा गंभीर जखमी झाला की त्याला 72 टाके घालावे लागले आहेत.
उडणारा फटका हातात फोडण्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी तरुणाचं नाव विनीतकुमार असून तो मधुबन बिल्डिंग परिसरात काम करतो. विनीतकुमार हा या ठिकाणी लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणजेच कंत्राटदार कामगार म्हणून काम करतो. दिवाळीनिमित्त तो सोशल मीडियावर रिल पोस्ट करण्याच्या उद्देशाने व्हिडीओ शूट करत होता. विनीतने आकाशात उडणारा 'स्कॉय-शॉट' प्रकाराचा फटका हातात धरुन पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र फटाका हातात धरुन ठेवल्याने तो उडण्याऐवजी हातातच फुटला. यामुळे मोठा स्फोट झाला आणि विनीतकुमारच्या हाताला मोठी दुखापत झाली.
72 टाके पडले, डॉक्टर काय म्हणाले?
या घटनेनंतर घाबरलेल्या विनीतकुमारचं कुटुंब घाबरुन गेलं. त्यांनी त्याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं. फटाक्यामुळे अपघाताची केस असल्याने सुरुवातीला दोन रुग्णालयांनी विनीतकुमारला दाखल करून घेण्यास नकार दिला, परंतु अखेरीस पश्चिम वसईतील आप्पासाहेब थोरात रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी चार ते पाच तास अथक परिश्रम करून एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. विनीतकुमारवर शस्रक्रीया करणाऱ्या डॉ. प्रवीण थोरात यांनी रुग्णाच्या प्रकृतीला धोका नसल्याचं सांगितलं. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेदरम्यान विनीतकुमारच्या हातावर एकूण 72 टाके घालण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली करण्यात आलेल्या प्लास्टिक सर्जरीनंतर, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉ. थोरात म्हणाले. दिवाळी साजरी करताना फटाके फोडण्याच्या नादात काहीही फाजील धाडस अथवा चूक करु नका असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.
रिलस्टारमुळे तीन एकरावरचा ऊस जळाला
दरम्यान, नांदेडमध्येही रीलच्या नादात एका शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे. हुल्लडबाजी करणाऱ्या रीलस्टार्सचा फटका या शेतकऱ्याला बसला. रीलसाठी फटाके उडवताना फटाका शेतात पडून तीन एकरवरील ऊसाला आग लागली. नांदेड शहराजवळील मरळक येथे ही घटना घडली. शेतकरी माणिक शिंदे यांचा तीन एकरावरील ऊस हुल्लडबाज रिल्स स्टार्समुळे जळाला. दिवाळीच्या दिवशी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास ऊसासमोर रिल्स काढण्यासाठी काही मुलं मुली येथे आले होते, त्यांनी रिल्स काढण्यासाठी हजारो रुपयांच्या फटाके फोडून आतिषबाजी केली. त्यातलाच एक फटाका ऊसाच्या शेतात जाऊन पडला आणि 3 एकरावरील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी आणि या अज्ञात रिल्स स्टार्सचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.