शायना एनसींनी फाडला बाळासाहेबांचा फोटो! भाजपाची शिंदेंच्या शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका, 'बाळासाहेबांवर समस्त हिंदू...'
सोनिया गांधींच्या नव्या पुस्तकाचा निषेध करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उपनेत्यांनी पुस्तकातली पानं फाडली. मात्र त्यासोबतच एक फोटो फाडताना शायना एनसी यांच्याकडून झालेल्या चुकीवरुन भाजपानेही नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींचं आत्मचरित्र 'बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह'वरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. या पुस्तकामध्ये वीर सावकरांचा अपमान करण्यात आल्याचा दावा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हा अपमान मान्य आहे का असा सवाल केला. मात्र या पत्रकार परिषदेनंतर पुस्तकाची पानं फाडताना अनावधानाने शिंदेंच्या पक्षाच्या पदाधिकारी शायना एनसी यांनी चुकून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला. या मुद्द्यावरुन विरोधकांनी आता शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला असतानाच भारतीय जनता पार्टीनेही या मुद्द्यावरून शिंदेंच्या शिवसेनेला गोचीत पकडलं आहे.
झालं काय?
"सोनिया गांधी यांनी त्यांच्या पुस्तकात सावरकरांनी सातत्याने ब्रिटिश सरकारकडे माफीची विनंती करत होते. उद्धव ठाकरे यांनी हे पुस्तक स्वीकारले आहे. उद्धव ठाकरे यांना प्रश्न आहे की, तुम्हाला सोनिया गांधी यांच्या पुस्तकाबाबत मान्य आहे का? हा सावरकरांचा अपमान नाही तर जनतेचा अपमान केला आहे. उद्धव ठाकरे काय करणार माहिती नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी जसे जोडे मारले तसे तुम्ही मारणार का? बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत काल एकही काँग्रेस कार्यकर्त्याने ट्वीटसुद्धा केले नाही मग तुम्ही आता काय करणार आहात?" असा सवाल शिंदेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शितल म्हात्रे यांनी पत्रकारांसमोर बोलताना केला. यावेळेस संजना घाडी, संजय निरूपम हे उपनेतेही उपस्थित होते. या सर्वांनी सोनिया गांधींच्या पुस्तकाची काही पानं फाडली. या पानांवर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त मजकूर लिहिला असून सावरकरांना बदनाम करण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना उपनेत्यांनी केली.
बाळासाहेबांचा फोटो फाडला
या नेत्यांनी यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला चप्पल मारल्याचा जुना फोटोही फाडला. कॅमेरासमोर हा फोटो फाडताना शायना एनसी यांनी चुकून मणिशंकर अय्यर यांच्या फोटोऐवजी बाळासाहेबांचा फोटो फाडला. त्यानंतर शायना एनसी यांनी हा फाडलेला फोटो समोरच्या कागदांखाली लपवल्याचंही कॅमेरात कैद झालं आहे.
शायना एनसी स्पष्टीकरण देत काय म्हणाल्या?
यावरुन आरोप केले जात असतानाच शायना एनसी यांनी, "मी मणिशंकर यांचा फोटो फाडला आहे. आम्ही फोटो फाडला तुम्ही फाडणार का? आम्ही आणखी फाडणार तुम्ही काय करणार?" असा सवाल केला आहे.
भाजपाकडूनही टीका
या प्रकरणावरून भारतीय जनता पार्टीनेही शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे. "बाळासाहेबांचे तसबीर फाडली गेली हे अत्यंत दुर्दैवी आहे. बाळासाहेब मराठी जणांचे हिंदूंसाठी आदरणीय आहेत. त्यांच्यावर समस्त हिंदू जन, मराठी जन प्रेम करतात. अनावधानाने फोटो फाडला गेला असेल पण या सगळ्यासंदर्भात शायना एनसी आणि पदाधिकाऱ्यांनी माफी मागणे गरजेचे आहे," असं नवनाथ बन यांनी म्हटलं आहे.