नवी मुंबई : नवी मुंबईतील सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. नेरुळजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात कार चालवणाऱ्या 29 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, या मुलीची मैत्रीण गंभीररित्या जखमी झाली आहे. या भीषण कार अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
भरधाव कार थेट रस्ता दुभाजकावर आदळली. त्यानंतर काही वेळातच कारने पेट घेतला. या भीषण अपघातात कार चालवणाऱ्या 29 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असून तिच्यासोबत असलेली मैत्रीण सुदैवाने बचावली आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथील एल.पी. उड्डाणपुलाजवळ हा अपघात घडला.
तन्वी भल्ला असे मृत तरुणीचे नाव आहे. तन्वी आपल्या मैत्रिणीसह मुंबईहून खारघरच्या दिशेने कारने जात होती. उड्डाणपुलाजवळ पोहोचताच कारवरील तिचं नियंत्रण सुटलं आणि कार थेट रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की तन्वी गंभीर जखमी झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तिला तातडीने डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.
एल.पी. उड्डाणपुलावरून पुढे जायचं की सर्व्हिस रोडने मार्गक्रमण करायचं, याबाबत चालकाचा गोंधळ झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नेरुळ पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर-सानगडी या मुख्य महामार्गावर डोंगरगाव गावाच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन इसमांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सानगडी गावाजवळील डोंगरगाव गावाबाहेर हा अपघात घडला. अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. या भीषण धडकेत दुचाकीवरील दोन्ही इसमांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलिसांकडून मृतांची ओळख पटलेली नाही. अपघातग्रस्त दुचाकी हिरो एचएफ डिलक्स, क्रमांक MH 36 AC 6787 अशी आहे. या दुचाकीच्या मालकाची किंवा मृत व्यक्तींची ओळख कोणाला असल्यास त्यांनी तातडीने अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, पोलिसांच्या तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.