महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी केलेल्या चर्चेदरम्यान देशातील रेजीम चेंजसंदर्भात व्यक्त केलेल्या शक्यतेवरुन आता भारतीय जनता पार्टीने राज यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. आधी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावरुन राज यांच्यावर निशाणा साधला असतानाच आता थेट राज यांना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळे सुरक्षा मिळाल्याचा उल्लेख करत भाजपाच्या नेत्याने मनसे अध्यक्षांना रेजीम चेंजवरुन डिवचलं आहे.
राहुल गांधींनी राज यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवल्याने ते...
भाजपाचे नेते परिणय फुके यांनी राज ठाकरेंना टोला लगावताना लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे सध्या व्हिएतनामला पिकनिकसाठी गेलेले असल्याने अतिरिक्त कार्यभार राज यांच्याकडे सोपवून गेल्याचं म्हटलं आहे. "राहुल गांधींनी सध्या ॲडिशनल चार्ज त्यांच्याकडे दिल्या त्यामुळे ते असे वक्तव्य करत आहेत," असा टोला फुके यांनी राज ठाकरेंना लगावला.
ही सिक्युरिटी काढण्यात येईल त्यावेळी...
तसेच, "राज ठाकरे इतक्या मोठ्या रेझीम चेंजबाबत ज्या बाता करत आहेत ते स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सिक्युरिटीच्या आधारावर बोलत आहेत. त्यांच्याकडे संविधानिक पद नाही. त्यामुळे त्यांना ही सिक्युरिटी देण्याची गरज नाही. म्हणूनच ज्या दिवशी ही सिक्युरिटी काढण्यात येईल त्यावेळी ते घराबाहेर निघणार नाहीत," असा टोला फुकेंनी राज यांना लगावला आहे.
राहुल गांधींच्या दौऱ्यावरुन बोलले
राहुल गांधींवरही निशाणा साधताना फुके यांनी, "प्रत्येक व्यक्तीला काही दिवसानंतर आपल्या बायका पोरांची आठवण येते," असं खोचक विधान केलं. "कितीही काम केलं, कितीही भाषण केले, कितीही आंदोलन केले तरी दोन-तीन महिन्यात आपल्या परिवाराकडे जाण्याची त्याची इच्छा असते म्हणूनच राहुल गांधी व्हिएतनामला गेले आहेत. यात काही वावगं नाही," असं फुके यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी अविवाहित आहेत मात्र ब्रह्मचारी नाही
"कितीही काम केलं, कितीही भाषण केले, कितीही आंदोलन केले तरी दोन-तीन महिन्यात आपल्या परिवाराकडे जाण्याची त्याची इच्छा असते म्हणूनच राहुल गांधी व्हिएतनामला गेले आहेत. यात काही वावगं नाही," असं फुके यांनी म्हटलं आहे. "राहुल गांधी अविवाहित आहेत मात्र ब्रह्मचारी नाही असं त्यांच्याबद्दल एक मतं आहे. त्यांच्या पक्षातील लोकांच्या माध्यमातून हे मत आलंय. दोन - तीन महिन्याकरता राहुल गांधी तिकडे गेले आहेत आरामाकरता! त्यांनी ॲडिशनल चार्जवर उद्धव ठाकरे जन राज ठाकरे यांना दिलेला आहे," असं परिणय फुकेंनी म्हटलं आहे.