आम्हाला अर्थखातं सोडून दुसरं कोणतंही खातं नको अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याची माहिती दिली. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. आम्हाला अर्थ खातंच हवं असून, हिवाळी अधिवेशनाच्या आधी आम्हाला खातं मिळेल असं वाटतं असं ते म्हणाले आहेत. तसंच विलिनिकरणाची कोणतीही चर्चा नसून हे वृत्त त्यांनी फेटाळून लावलं आहे.
"आता बरेच दिवस झाले असून, आमचं अर्थखातं जे त्यांनी द्यायला हवं ते लवकरात लवकर दिलं पाहिजे. कारण यासंदर्भात चर्चा होत असून, हे योग्य नाही. यांसदर्भात ते (मुख्यमंत्री) सकारात्मक होते. सध्या दुष्काळ, निधीची जुळवाजुळव सुरु असून ते झाल्यावर ते देऊ असं त्यांनी सांगितलं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हे खातं मिळेल अशी आशा आहे," असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
दिल्लीतील वरिष्ठांनी मुख्यमंत्र्यांना आणि ताईंना स्वातंत्र्य निर्णयाचं दिलं आहे. यामुळे त्यांची काही आडकाठी नाही असंही ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांना भाजपाने अर्थखातं ठेवून इतर खातं दिल्यास असा प्रश्न विचारला असता त्यांनी, नाही, नाही नाही, आम्हाला अर्थखातंच पाहिजे असं स्पष्ट केलं.
"शेतकऱ्यांना फार मोठे निधी शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत. कर्जमुक्ती योजनाही सुरु आहे. मोठी रक्कम तयार करावी लागणार आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्यावी लागणार असल्याने थोडा वेळ लागेल. मंत्रीपदं रिकामी आहेत त्यासंदर्भात एकत्रित निर्णय होईल. मंत्रिमंडळ विस्ताचारा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे," असं ते म्हणाले आहे. मुख्यमंत्र्यांकडे तारीख सांगा अशी मागणी करु शकत नाही असं सांगत त्यांनी खातं नेमकं कधी मिळेल हे सांगण्यास नकार दिला.
"पण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटले आणि विलिनीकरणाची चर्चा सुरु झाली असा कोणताही विषय अजेंड्यावर नव्हता आणि नाही. अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. मंत्री बदलणार असंही नाही. त्याची थोडीही चर्चा झालेली नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं.