अंबादास दानवे : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. तर, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. अशातच संजय राऊतांनी राष्ट्रवादीत मोठी फूट पडण्याचं भाकीत केले आहे. तर, भविष्य शोधण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार पक्षातून बाहेर पडतील असा खळबळजनक दावा ठाकरेंच्या बड्या नेत्याने केला आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही मोठा दावा केला आहे.. भविष्य शोधण्यासाठी आमदार पक्षातून बाहेर पडणार असा दावा त्यांनी केला आहे. विलिनीकरणाचा काही निर्णय घ्यायचा असेल किंवा त्या संदर्भात चर्चा करायची असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्हाला विश्वासात घेईल असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी चार दिवसांपूर्वी केलं होतं. राष्ट्रवादी हा एनडीएमधील सहकारी पक्ष असल्याचंही फडणवीस यांनी म्हटल आहे.
राष्ट्रवादीतून आमदार फुटणार असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 20 ते 22 आमदार राष्ट्रवादीमधून बाहेर पडणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे... दरम्यान राऊतांच्या या दाव्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना टोला लगावला आहे.
सिल्वर ओकवर अनेक नेते शरद पवारांच्या भेटीसाठी येत आहेत. विलिनीकरणाच्या याच सर्व घडामोडींवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. जशी वेळ येईल तशा गोष़्टी कळतील असं सूचक विधान सुनेत्रा पवारांनी केले. सुनेत्रा पवारांच्या एका वाक्यातील उत्तरानं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना बळ मिळाल्याचं बोललं जात आहे.
राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच, बीडमध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याचं चित्र पाहायला मिळालं. शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे आणि अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी एकत्र येत गाळपेरा कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, या चर्चांना बीडमधून आणखी हवा मिळाली. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाचे आयोजक शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी मात्र दुष्काळाच्या परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याची भूमिका मांडली.
आमदार विजयसिंह पंडित यांनीही राजकारण नसल्याचं स्पष्ट केलं. तर खासदार बजरंग सोनवणे यांनी विलीनीकरणाच्या चर्चेवर सूचक विधान करत, दोन वर्षांपासून चर्चा सुरू असल्याचं सांगितले. मात्र या कार्यक्रमाला आमदार संदीप क्षीरसागर यांची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे दुष्काळाच्या निमित्ताने एकत्र आलेले दोन्ही राष्ट्रवादीचे नेते राजकीय चर्चांना पूर्णविराम देणार की नव्या चर्चांना सुरुवात करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.