...तेव्हा संजय राऊत काँग्रेसमध्ये जातील! विद्यमान खासदाराचं भाकीत; सूचकपणे सांगितली तारीख
ऑपरेशन टायगरच्या तिसऱ्या भागाची जोरदार चर्चा सुरु असतानाच आता थेट संजय राऊत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची साथ सोडतील अशी शक्यता एका विद्यमान खासदाराने व्यक्त केली आहे. नेमकं काय म्हटलंय या खासदाराने जाणून घ्या...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर 3.0 ची चर्चा सुरु झालेली असतानाच यावरून राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. असं असतानाच याचसंदर्भातून बोलताना एका विद्यमान खासदाराने थेट उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हेच ठाकरेंची शिवसेना सोडतील असं भाकित व्यक्त केलं आहे. प्रसारमाध्यमांशी ऑपरेशन टायगरसंदर्भात बोलताना हे विधान करण्यात आलं आहे. राऊत ठाकरेंची शिवसेना सोडून कोणत्या पक्षात जातील याबद्दलही या खासदाराने थेट नाव घेत भाष्य केलं आहे.
...तेव्हा ऑपरेशन टायगरसारख्या गोष्टी होतात
ऑपरेशन टायगर संदर्भात बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकलं नाही, त्यांना मान-सन्मान दिला नाही की ते पक्ष सोडतात. "कार्यकर्त्यांना पक्षात चांगली वागणूक मिळत नसेल, त्यांचं ऐकलं जात नसेल तर कार्यकर्ते नाराज होऊन उठाव करतात. आपलं अस्तित्व ज्या पक्षात नाही तिथं राहायचं कशाला असा प्रश्न त्यांना पडतो आणि उठाव करून ते पक्ष सोडतात. हे कोणत्याही राजकीय पक्षात होऊ शकतं. कार्यकर्ते जेव्हा पक्ष सोडतात तेव्हा त्यांनाही यातना होतात. या पक्षाचं काही खरं नाही अशी भावना तयार होते तेव्हा ऑपरेशन टायगरसारख्या गोष्टी होतात," असं मत शिरसाट यांनी नोंदवलं.
संजय राऊत काँग्रेसमध्ये जातील
ऑपरेशन टायगरसंदर्भात बोलताना खासदार नरेश म्हस्केंनी ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत येणाऱ्यांचा ओघ प्रचंड असल्याचं म्हटलं आहे. मात्र समोरच्या पक्षात मोजके नेते शिल्लक राहतील म्हणून आम्ही अनेकांना प्रवेश नाकारत असल्याचं म्हटलं आहे. "तिकडे (ठाकरेंच्या शिवसेनेत) कोणच उरणार नाही या भावनेमुळे आम्ही काही लोकांना पक्षप्रवेश नाकारत आहे. असं झालं तर आम्हाला वाईट वाटेल म्हणून आम्ही काही लोकांना नाकारतोय पक्षप्रवेश! नाहीतर केवळ संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे एवढेच राहतील. संजय राऊत राज्यसभेची निवडणूक आली की कदाचित ते काँग्रेसमध्ये जातील," अशी शक्यता ठाण्याचे खासदार असलेल्या म्हस्केंनी व्यक्त केली आहे.
राऊतांचा कार्यकाळ कधी संपतोय?
संजय राऊत यांच्या सध्याच्या राज्यसभा खासदारकीचा कार्यकाळ 4 जुलै 2028 रोजी संपत आहे. , त्यांनी आतापर्यंत चार वेळा राज्यसभेचे खासदार म्हणून काम पाहिले आहे. ते 2004 पासून राज्यसभा खासदार आहेत. म्हणजेच राऊत 2028 मध्ये ठाकरेंची साथ सोडून काँग्रेसमध्ये जातील असं म्हस्केंचं म्हणणं आहे. सध्याची ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची संख्या पाहता राऊत पुन्हा राज्यसभा खासदार म्हणून निवडून येणं या संख्याबळाच्या जोरावर कठीण दिसत आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेनं काय म्हटलं?
ऑपरेशन टायगरसंदर्भातील चर्चेवरून निशाणा साधताना आंबादास दानवेंनी थेट एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. "आता एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन होण्याचा वेळ आला आहे. भाजपा आता लवकरच त्यांचं ऑपरेशन करेल असं वाटतंय," अशी प्रतिक्रिया ऑपरेशन टायगरच्या चर्चा फेटाळून लावताना दानवेंनी नोंदवली आहे.