राज ठाकरे : डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याचा निर्णय शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जाहीर केला आहे. जितेंद्र आव्हाडांनी याबाबत माहिती दिली. राष्ट्रवादीच्या घोषणेनंतर देशासह राज्याच्या राजकारणाच खळबळ उडाली. अनेकांनी शरद पवारांच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षाने जाहीर टीका केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसनेने देखील पवारांच्या राष्ट्रवादीवर नाराजी वक्त केली आहे. शरद पवार यांनी भाजपला पाठिंबा दिल्यांनतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत पवारांवर थेट निशाणा साधला आहे.
2 जुलै 2023 ला जेंव्हा राष्ट्रवादीची एक टीम फुटून भाजपच्या दिशेने सरकली होती त्यावेळेस मी हे बोललो होतो. अर्थात पुढे 3 वर्ष दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी यथोचित भांडणाचं नाटक केलं आणि मी म्हणलं तसं सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीम आता हलकारे देत निघाली आहे. मी मध्ये एकदा म्हणलं होतं की हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं. असो.
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील 'दिगू टिपणीस' झाला.
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच ! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?
राज ठाकरे