राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेनं मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर छटपूजेचे विधी करण्याला विरोध केला आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेनं गणेशोत्सव आणि नवरात्रीमध्ये घातलेल्या निर्बंधांचा आणि पर्यावरणपूरक भूमिकेची आठवण करून देत आपलं म्हणणं मांडलं असून गणेशोत्सव, नवरात्राप्रमाणे छटपूजेसाठीही कृत्रिम तलाव उभारण्याची मागणी केली आहे.
मनसेचं नेमकं म्हणणं काय?
समुद्रात छटपूजा करण्यास मनसे विद्यार्थी सेनेचा आक्षेप घेतला आहे. प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष कुशल धुरी यांनी आक्रमकपणे पक्षाची भूमिका मांडली आहे. "गणेशोत्सव आणि नवरात्रात समुद्रात विसर्जनास मनाई, मग छटपूजेला विशेष सवलत का?" असा सवाल धुरी यांनी उपस्थित केला आहे. तसेच, "मराठी सणांवर निर्बंध, मात्र परप्रांतीयांच्या सणांसाठी पालिकेच्या विशेष सुविधा का?" असा सवालही धुरी यांनी टीका करताना केला आहे. "छटपूजेसाठी समुद्राऐवजी कृत्रिम तलावांची व्यवस्था करावी अशी आमची मागणी आहे," असल्याचं धुरी यांनी स्पष्ट केलं आहे. जर प्रदूषण टाळण्यासाठी मराठी सणांना म्हणजेच गणेशोत्सव आणि नवरात्रीमध्ये मूर्ती विसर्जनासाठी समुद्रात जाण्यास बंदी घालून कृत्रिम तलावांचे नियम लावले जातात, तर मग छटपूजेलाच समुद्रकिनाऱ्यावर साजरी करण्याची विशेष सवलत का दिली जातेय? असा मनसेचा सवाल आहे.
अश्विनी भिडेंना भेटणार
सदर मागणीसंदर्भातील निवेदन देण्यासाठी मनसेचे पदाधिकारी लवकरच निवेदनासहीत मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेणार असल्याची माहितीही धुरी यांनी दिली आहे. मराठी सणांसाठी एक नियम आणि इतर सणांसाठी वेगळे नियम का? असा मनसेचा पालिकेला सवाल असल्याचंही धुरींनी सांगितलं. मनसेनं घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे छटपूजेच्या व्यवस्थेवरून मुंबईत नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. छटपूजेच्या तोंडावर मुंबईत पुन्हा एकदा स्थानिक विरुद्ध परप्रांतीय आणि मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कधी आहे छटपूजा?
यंदाचा छठपूजा उत्सव 13 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबरदरम्यान साजरा केला जाणार आहे. रविवारी 15 नोव्हेंबर रोजी मुख्य संध्या अर्घ्य (डूबत्या सूर्याला अर्घ्य) दिले जाणार आहे. सोमवारी 16 नोव्हेंबर रोजी उषा अर्घ्य देऊन या महाव्रताची सांगता केली जाईल.
महापालिकेने काय तयारी केली?
छटपूजा आयोजकांना परवानग्या मिळण्यात अडचण येऊ नये म्हणून पालिकेने विभागीय कार्यालयांच्या स्तरावर एकल खिडकी योजना सुरू केली आहे. म्हणजेच यासंदर्भातील सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच प्रत्येक पूजा घाटावर समन्वय ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समुद्रकिनाऱ्यांवर विशेष तयारी
तसेच मुंबईतील छटपूजा स्थळांवर 24 तास पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट्स आणि महिला भाविकांसाठी कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र चेजिंग रूम उभारण्यात येत आहेत. मुंबईतील सर्व मुख्य चौपाट्यांवर पूजेच्या काही दिवस आधीपासूनच विशेष स्वच्छता केली जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने चौपट्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे, विद्युत रोषणाई, अग्निशामक दल आणि जीवरक्षकांची पथके तैनात करण्यात येणार आहेत.