राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) अध्यक्ष शरद पवारांना प्रकृतीच्या कारणास्तव पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर दोन दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आता वैद्यकीय चाचण्यांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णलायात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान डिस्चार्ज मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी त्यांनी त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. दरम्यान संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आजारपणातही राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
लालू यादवही मोठे नेते असून आजारी असतानाही नरेंद्र मोदींनी त्यांना फोन केला नाही सांगत संजय राऊतांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी आपल्या सोयीप्रमाणे चौकशी करत असून, ते खोटारडे गृहस्थ आहेत. आजारपणांच्या चौकशीतही राजकारण करतात असा आरोप त्यांनी केला आहे. तसंच शरद पवार त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत असं म्हटलं आहे.
"नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत पण खोटारडे गृहस्थ आहेत. शरद पवार आजारी आहेत म्हणून फोन केला. पण मग लालू यादवही आजारी आहेत. लालू यादवसुद्धा मोठे नेते आहेत. पंतप्रधानांनी देशातील सर्व प्रमुख नेते, ज्यांनी कधी सत्तेत, विरोधी पक्षात महत्त्वाची कामगिरी निभावली आहे त्या सगळ्यांचीच चौकशी केली पाहिजे. पण सोयीची चौकशी करतात," असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, "सुप्रिया सुळेंचे नाव घेऊन संभ्रम निर्माण केला. आजारपणांच्या चौकशीतही राजकारण करतात. मोदींनी कितीही फासे टाकले तरी त्यांना पवार साहेब आणि त्यांचा पक्ष भूलथापांना बली पडणार नाहीत".
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, अशी माहिती विठ्ठल मणियार यांनी दिली. पंतप्रधानांनी शरद पवार यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला, असे त्यांनी सांगितले.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी पवार साहेबांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी अत्यंत आपुलकीने व आदराने संवाद साधत, पवार साहेबांना पूर्ण विश्रांती घेण्याची विनंती केली. पंतप्रधान मोदींनी त्यांना सांगितले की, सुप्रिया आता पूर्णपणे सज्ज आहेत आणि त्या इतर सहकाऱ्यांसोबत देशाची जबाबदारी सांभाळतील, त्यामुळे पवार साहेबांनी आता विश्रांती घ्यावी," असे मणियार यांनी सांगितले.
पवार साहेबांनी प्रकृतीची विचारपूस केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले, असेही त्यांनी सांगितले. "पवार साहेबांनी पंतप्रधानांना सांगितले की, ते विश्रांती घेत आहेत आणि देशाला काहीही काळजी करण्याचे कारण नाही, कारण सर्व गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी सर्वजण इथे आहोत. त्यांनी आपली विचारपूस केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले," असे त्यांच्या सहाय्यकाने सांगितले.