माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊतांवर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात बोलताना अनेक पक्षांसाठी सत्ताधाऱ्यांकडून जाळी टाकली जात असल्याचं विधान केलं. यावरुनच डिलिमिटेशन विधेयकाचा संदर्भ देत बन यांनी राऊतांना सुनावलं असून महिला सशक्तीकरणाच्या मुद्याबद्दल बोलताना 'पाटकर' प्रकरणाचा उल्लेखही केला आहे.
राऊत काय म्हणाले?
शरद पवार हे सत्ताधारी एनडीएसोबत जाणार, दोन्ही राष्ट्रवादी विलीन होणार यासंदर्भातील चर्चांबद्दल बोलताना संजय राऊत यांनी, "मी वारंवार सांगत आहे की शरद पवार यांच्याविषयी ज्या बातम्या सातत्याने प्रसारित केल्या जात आहेत. मोदींचा फोन आला मग ते अमुक बोलले. देश सांभाळू म्हणाले. मग पक्ष का फोडले? या सगळ्या बातम्या दुर्ललक्षित कराव्यात. त्या निरर्थक आहेत. कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी त्यांची (शरद पवारांची) विचारधारा आहे. त्यात कोणतीही गडबड झाली नाही, होणार नाही," असा विश्वास पत्रकारांसमोर व्यक्त केला. याचसंदर्भातून पुढे, "तुम्ही (अजित पवारांच्या पक्षाचे नेते) जिथे आहात तिथे तुम्हाला कोण विचारत नाही. त्यामुळे ते पवार यांच्या नेतृत्वात येत आहेत. तुम्हाला मान्यता मिळावी म्हणून पवार साहेब जातील त्यांच्यात असे वाटत नाही. अनेक जणांवर जाळे टाकण्यात येते पण कोणी त्यात फसत नाहीये. द्रमुकने सांगितले आहे की आम्ही येणार नाही. आम्ही सुद्धा जाणार नाही," असं राऊत यांनी सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा करताना म्हटलं.
राऊतांवर निशाणा
आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत जाणार नाही या राऊत यांच्या विधानावरुन बन यांनी खोचक टीका करताना, "लोकसभेत संजय राऊत यांच्या पक्षाचे खासदार किती? टू व्हीलरवर बसतील एवढे दोन खासदार आहेत," असं म्हटलं. तसेच, "डिलिमिटेशन विधेयक हे मंजूर होईल. महिलांचा सन्मान करण्याचा काम पंतप्रधान मोदी करतील. तुम्ही महिलांना कशा अश्लील भाषेत बोलतात हे पाटकर फाईल्स माध्यमातून दिसतंय," असा टोला बन यांनी लगावला आहे. "2019 ला सत्तेसाठी लाचार कोण झालं? 2019 ला भाजप-सेना युतीला जनतेने समर्थन दिलं होतं. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व सोडून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. तेव्हा तुम्ही लोकशाहीचा गळा दाबला होता," अशी टीका बन यांनी केली.
फडणवीसांची शेतकऱ्यांसहीत दिवाळी
"दिवाळीत शेतकऱ्यांना मदत मिळत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करत आहेत. आम्ही घरी बसून दिवाळी साजरी करत नाही. आजपर्यंत एकाही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केली नाही तशी दिवाळी मुख्यमंत्री साजरी करणार आहेत," असं नवनाथ बन म्हणाले.
...तर गोकुळमध्ये फेरनिवडणूक
"गोकुळ निर्णयाबद्दल प्रकाश आबिटकर यांची भूमिका काय? 'गोकुळ'च्या नियमनुसार 14 जण जमणार नाही तोपर्यंत 'गोकुळ'ची बैठक घेता येत नाही.
14 लोक न सतेज पाटील यांच्याकडे आहेत. ना महायुती कडे 14 आहेत. महिनाभरात जर अध्यक्ष बसला नाही तर 6 महिने प्रशासक बसेल. नंतर पुन्हा फेरनिवडणूक होईल. 10 तारखेला बैठक बोलवली आहे. 4 जणांचा समावेश होईल. कोरम पूर्ण होईल अध्यक्ष निवडला जाईल," असं बन यांनी गोकुळसंदर्भातील पेचावर भाष्य करताना म्हटलं.