बाळासाहेबांचा 'तो' फोटो सोनिया गांधींच्या पुस्तकात छापलेलाच नाही; मग तो शायना एनसींकडे कसा आला? फाडण्यात आलेला फोटो कोणी आणि कशासाठी तिथं आणलेला?
राज्यातील अनेक शहरांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शायना एनसी यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्त्या रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतानच वादग्रस्त फोटोसंदर्भात रंजक माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शायना एनसी यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आज मुंबईसहीत महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. बुधवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेच्या शेवटी शायना एनसी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ ही आंदोलनं केलं जीत आहेत. या प्रकरणी शायना एनसी यांनी माफीही मागितली आहे. मात्र असं असतानाच आता शायना एनसी यांनी फाडलेल्या फोटोसंदर्भातील एक विचित्र माहिती समोर आली आहे.
फोटो त्या पुस्तकात नाहीच
शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय निरूपम, शायना एनसी, शितल म्हात्रेंनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचं आत्मचरित्र 'बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकामध्ये वीर सावरकरांबद्दल अपमानास्पद लिखाण करण्यात आल्याचा आरोप केला. याचा निषेध उद्धव ठाकरे करणार का असा सवाल शिंदेंच्या नेत्यांनी विचारला. उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या शेवटी शायना एनसी यांच्यासहीत सर्व उपनेत्यांनी सोनिया गांधींच्या या पुस्तकात सावरकरांबद्दल वादग्रस्त लिहिलेल्या मजुराची पानं फाडली.
मात्र सोनिया गांधींच्या पुस्तकातील ही पानं फाडताना शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारत असल्याचा फोटोही फाडला. मात्र जो फोटो शायना एनसी यांनी फाडला तो सोनिया गांधींच्या पुस्तकातला नाही. या फोटोचा आणि सोनिया गांधींच्या पुस्तकाचा तसा काहीच थेट संबंध नसल्याचं समोर आलं आहे.
हा फोटो इथं आला कुठून?
हा फोटो सोनिया गांधींच्या पुस्तकात नाही मग हा फोटो या पत्रकार परिषदेमध्ये अगदी शायना एनसींपर्यंत पोहोचला कसा? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर हा फोटो या ठिकाणी संजय निरूपम घेऊन आले होते. 2004 साली तत्कालीन केंद्रीय मंत्री मणीशंकर अय्यर यांनी सावरकरांसंदर्भात वादग्रस्त विधानं केल्यानंतर कशाप्रकारे शिवसेनेनं आंदोलन केलं होतं याचा संदर्भ हा फोटो दाखवत पत्रकार परिषदेत देण्यात आला. स्वत: बाळासाहेबांनी काँग्रेस नेत्याच्या पुतळ्याला जोडे मारले होते. सावरकरांचा अपमान बाळासाहेबांनी सहन केला नाही असं म्हणत उद्धव ठाकरे ही अशी हिंमत दाखवतील का? असा सवाल शिंदेंच्या नेत्यांनी हा 22 वर्षांपूर्वीची फोटो दाखवत विचारला. पत्रकार परिषदेत हा फोटो दाखवून उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यात आलं.
मात्र शेवटी पुस्तकातील पानं फाडताना हा फोटो शायना एनसी यांच्या हाती आला आणि त्यांनी तो फाडल्याने मोठ्या वादाला तोंड फुटलं. त्यामुळेच पुस्तकाचा निषेध करताना पुस्तकात नसलेला फोटो फाडल्याने हा मोठा वाद निर्माण झाला आहे.