मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला असून एकच खळबळ उडवून दिली आहे. एकनाथ शिंदेंनी भाजपाकडून 500 कोटी घेतले आणि मला दिले असं भाजपा नेत्यांना सांगितलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदेंना हे खरं आहे की नाही हे जाहीर करावं असं आव्हान दिलं आहे. तसंच आपल्याकडे यासंदर्भात पुरावा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यानंतर शिवसेना नेते नरेश म्हसके यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
जरांगे पाटलांच्या 500 कोटींच्या आरोपावर ते म्हणाले आहेत की, "एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाकरिता जे काम केलेलं आहे, ते यापूर्वी मनोज जरांगे यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे आणि मराठा समाजही ते मान्य करीत आहे. ते मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राज्य सरकार मराठा समाजाला न्याय देण्याकरता प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. मला आताच जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपासंदर्भात समजले. शिंदे हे देणारे आहेत, शिंदे साहेब कुणाकडून काही घेणारे नाहीत, हे संपूर्ण हिंदुस्थानला माहिती आहे".
"आज दसरा मेळावा आहे, दुर्जनांचा नाश करण्याचा दिवस आहे. त्या दिवशी मी मनोज जरांगे यांना दसऱ्याच्या आणि येणाऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा देतो. परंतु एखाद्या मोठ्या नेत्यावर आरोप करताना किंवा त्याच्याविषयी मत व्यक्त करताना विचार करून मत व्यक्त करणं गरजेचं आहे. त्यांनी काय वक्तव्य केल त्याचा थोडा मी अभ्यास करतो आणि मग त्याचं उत्तर देतो," असं ते म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितलं की, "कोणी कोणाला संपवण्याचा हा विषय नाही. मराठा समाजाचं काम आहे. मराठा समाजाचे आपण नेते आहात. मनोज जरांगे म्हणून आम्ही तुमचा आदर करतोय. आम्हीसुद्धा मराठा समाजामध्येच काम करतो. आम्हीसुद्धा मराठा समाजाचेच आहोत, त्यामुळे कुणाला संपवण्याचा विषय नाही. शिंदे साहेबांना टार्गेट करण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल, तर त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की शिंदे साहेब हा जनमाणसांमधला, मातीशी नाळ जुळलेला नेता आहे. सर्वसाधारण कार्यकर्त्यांपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केलेली आहे आणि ते इथपर्यंत पोचलेले आहेत. त्यामुळे असे कोणीही प्रयत्न करत असतील तरी शिंदे साहेबांचं लोकांच्या मनावरचं स्थान कुठेही कमी होणार नाही".
"एकनाथ शिंदे तुम्ही भाजपाच्या लोकांना असं सांगितलं आहे का, की मनोज जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये द्यायचे आहेत. तुम्ही भाजपाकडून 500 कोटी घेऊन मला दिले आहेत असं भाजपाच्या नेत्याला सांगितलं का? कारण ते नेते कुजबुज करु लागले आहेत की, मनोज जरांगे पाटलांना श्रीकांत शिंदेंच्या हातून 500 कोटी पोहोचले आहेत. जरांगे पाटील आपले थर्ड पर्सन आहेत असं तुम्ही भाजपाला सांगितलं का? तुम्ही जर मला 500 कोटी दिले नसतील तर भाजपा नेमकं तुम्हाला संपवत आहे की तुम्ही मला याचा छडा लावल्याशिवाय शांत बसणार नाही," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
पुढे ते म्हणाले की, "'मी सोडणार नाही. भाजपात अंतर्गत चर्चा सुरु आहे. पण मनोज जरांगे सोपा नाही. मी मुळात हात घातला आहे. चर्चा कोणाच्यात झाली याचे पुरावे द्या असं सांगितलं आहे. माझ्याकडे पुरावा असून, तो समोर आणणार आहे. शिंदे भाजपाला खोटं बोलले आहेत. त्यांच्याकडून 500 कोटी घेऊन मला दिले सांगितलं. मग 500 कोटी कुठे आहेत? मी 5 हजारांचा गठ्ठाही बघितलेला नाही. शिंदेजी, हे जर खोटं असेल तर दिलखुलास सांगावं. मग मी त्यांच्याकडे पाहतो. खरं असेल तर तसंही सांगावं, की माझ्या मुलाच्या हातून 500 कोटी दिले".