'नवनाथ बन शिंदेसाहेबांवर बोलताना लायकीत राहायचं', निलेश राणेंनी दिला इशारा, 'तुझी लायकी किती, तू....'
शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांना प्रत्युत्तर दिलं असून, शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत रहा असा इशारा दिला आहे.
विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीतील निकालात धक्का बसल्यानंतर महायुतीमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. पुणे आणि नागपूरमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि नागपूरमध्ये काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांचा विजय झाल्याने हा पराभव भाजपाला जिव्हारी लागला आहे. भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही असा थेट आरोप केला होता. यानंतर आता शिवसेना आमदार निलेश राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं असून लायकीत राहा असा इशारा दिला आहे.
"नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत रहा , तुझी लायकी किती तू बोलतो किती", अशी पोस्ट निलेश राणे यांनी केली आहे. याआधीही निलेश राणे यांन पत्रकार परिषदेतून यावर भाष्य करताना टीका केली होती. नवनाथ बन म्हणजे काय भाजपा नाही ना? नवनाथ बन कोण आहे? एक प्रवक्ता आहे. एवढं सगळं तो बोलतोय, त्याच्या मागचा बोलविता धनी पण वेगळा असू शकतो. नवनाथ बनमध्ये एवढी हिंमत नाही हे सगळं बोलायची असं सूचक विधान त्यांनी केलं होतं.
हे ही वाचा - 'धंगेकर तुमची कुवत आणि औकाद काय', प्रवीण दरेकर संतापले, 'फडणवीसांवर बोलताना भान ठेवा, शिंदेंनी विचार करावा तुमची...'
"आमच्यासाठी भारतीय जनता पक्ष हा आमचाच पक्ष आहे, आमचा मित्रपक्ष आहे, आमचा सहयोगी आहे, कुटुंबासारखे राहतो आम्ही. इतर वेळेला तर असे एक दोन लोकांमुळे आमच्या युतीला काही फरक पडत नाही. पण ही जी एक दोन लोकं जो मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करतात ना, त्यांनी आत्ताच आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवावं. जिभेवर आवर घालावा. नाहीतर आमची जीभ कशी आहे हे सगळ्यांना माहिती आहे," असंही ते म्हणाले होते.
ते म्हणाले, "आम्ही साताऱ्याला होतो, पक्षाने पाठवलं होतं, सगळे एकोप्याने काम करत होते. मग असं काय झालं की तुम्हाला शिवसेना जबाबदार वाटली? कसलाही पुरावा न देता थेट आरोप करणे चुकीचे आहे." "नवनाथ बन हे भाजपचे प्रवक्ते आहेत, पण त्यांच्यात एवढी ताकद नाही. त्यांच्या मागे बोलवता धनी कोण आहे? आम्ही भाजपचा, फडणवीस साहेबांचा, शिंदे साहेबांचा आदर करतो. नेत्यांमध्ये प्रेम, संवाद, आपुलकी आहे. मग नको ती लोकं आमच्या पक्षावर बोलणार आणि आम्ही ऐकून घेणार का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
"युती आपण युतीमध्ये आहोत. कसलेही पुरावे न देता तुम्ही थेट आरोप करणार. हे बरोबर नाही. युती टिकवायची आहे आपल्याला. भांडणं लावायची असतील तर हे टिकणार नाही. मिसमॅनेजमेंट तुमचं झालंय, त्याचं खापर तुम्ही शिवसेनेवर का फोडताय? नाव घेऊन टीका करा, अमुकांनी काम केलं नाही सांगा. हवेत गोळीबार करू नका. शिवसेनेवर बोलाल तर शिवसेनेसारखेच उत्तर मिळेल," असं त्यांनी म्हटलं.
नवनाथ बन यांनी केली होती पोस्ट
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला. त्यांना मिळालेली मतं पदवीधर निवडणुकीत भाजपला मिळाली नाहीत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच्या विरोधात प्रचार केला. त्याचाही फटका बसला असा आरोप नवनाथ बन यांनी केला आहे.
शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता. मात्र, पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नाही असंही ते म्हणाले आहेत.