'तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त करु' इशारा देणाऱ्या चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांनी दिलं उत्तर, 'जे स्वतः मर्द नसतात...'
हातात सत्ता असल्यावर कुत्र्याला वाटत की मी वाघ आहे, हे तर वळू आहेत अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजपा नेते चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे.
गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात बाजी मारल्यानंर महायुतीच्या नेत्यांनी विजयी जल्लोष केला. विशेष म्हणजे निकाल लागण्याआधीच काही नेत्यांनी उमेदवार राजेश पाटील यांचा विजय जाहीर करत जल्लोष सुरु केला होता. महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांना 16 मतं मिळाली, तर समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांना 13 मतांवर समाधान मानावं लागलं. शासननियुक्त संचालकांच्या मतदानामुळे निकालाचं पारडं महायुतीच्या बाजूने झुकलं. दरम्यान गोकुळमध्ये विजयी होण्याआधी आणि झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी थेट सतेज पाटील यांना लक्ष्य केलं. यावेळी चंद्रकांत पाटलांनी तर फडणवीसांनी डोळे वटारले तर तुमचं साम्राज्य उद्धवस्त होईल असा इशाराच दिला. त्यांच्या या इशाऱ्याला शिवसेना खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे.
गोकुळ विरोधकांच्या ताब्यात गेलं असतं, तर सहा महिन्यांत त्याचं नाव डी. वाय. पाटील दूध संघ झालं असतं, असा टोला महाडिक यांनी लगावला.तर दुसरीकडे खासदार धनंजय महाडिकांनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सतेज पाटलांना टार्गेट केलं सतेज पाटलांच्या संपत्तीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी थेट सवाल उपस्थित केले. डी वाय पाटील स्कुटरवरून फिरत होते, आता त्यांच्याकडे इतकी प्रॉपर्टी कुठून आली हे जाहीर करा असे आव्हान दिलं.
'जे स्वतः मर्द नसतात त्यांना दुसऱ्याच्या कर्तबगारीचा द्वेष'
चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर राऊत म्हणाले की, "चंद्रकांत पाटील यांच्यासारखे विध्वंसक लोक, जे स्वतः मर्द नसतात त्यांना दुसऱ्याच्या कर्तबगारीचा द्वेष वाटतो. कारण ते स्वत: कर्तबगार नसतात. डी वाय पाटील हे कोल्हापुरात स्कुटरवरुन फिरत होते, त्याचा आणि गोकुळ दूध संघाचा काय संबंध? स्कुटरवरुन फिरणाऱ्या एका व्यक्तीने स्वत:ची हिंमत, कर्तृत्व आणि अक्कल हुशारीवर जगभरात एक शैक्षणिक साम्राज्य उभं केलं याचं मराठी माणसाला कौतुक आहे. चंद्रकांत पाटलांना ते नसावं. त्यांना मोदी आणि शाहांचं कौतुक असेल आम्हाला डी वाय पाटलांच आहे".
हे ही वाचा - 'फडणवीसांनी डोळे वटारले तर...', सतेज पाटलांना चंद्रकांत पाटलांचा कोल्हापुरातून इशारा; थेट प्रॉपर्टीच काढली, 'वैचारिक उंची पाहून...'
'मोदी चहा विकत होते तर मग आता वैभव कसं उभं राहिलं'
पुढे ते म्हणाले की, "मोदी चहा विकत होते तर मग आता वैभव कसं उभं राहिलं. अदानीही स्कुटरवरुन फिरत होते. चंद्रकात पाटलांना माहिती नाही का? त्यांना विचारता येत नसेल तर मी त्यांची आणि अदानींची भेट घडवून आणतो. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गुजरातचा होऊ शकतो तर मग डी वाय पाटील स्कुटवरुन फिरत असताना इतकं साम्राज्य उभं कसं केलं असा प्रश्न का पडतो. प्रत्येक मराठी माणसाने अशा प्रकारचं साम्राज्य उभं करावं या मताचे बाळासाहेब सुद्धा होते. तुम्ही जे पैसे देऊन कोथरुडला मत खरेदी केले ते पैसे कुठून आले? कोणत्या खात्यातून आले?".
'हातात सत्ता असल्यावर कुत्र्यालाही वाटतं की मी वाघ'
अशा प्रकारची भाषा मंत्र्यांनी करावी हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याला आवर घातला पाहिजे. कोणी खून करत सुटलं आहे. कोणी खुन्यांना समर्थन देत आहे, कोणी लोकशाही विकत घेत आहे. कोणाला आव्हाने देत आहेत. उद्ध्वस्त करेन ही अशी भाषा मंत्री करतोय. हातात सत्ता असल्यावर कुत्र्यालाही वाटतं की मी वाघ आहे, हे तर वळू आहेत. पण ते वाघ नसतात अशीही टीका त्यांनी केली.
'इतिहासात असा काळा दिवस नाही'
"काल गोकुळची निवडणूक पार पडली नाही. काल जे घडले त्याला निवडणूक म्हणत नाही. निवडणूक 25 सदस्यांमध्येच व्हायला पाहिजे. 13 चे बहुमत असलेले पॅनल शेतकऱ्यांनी निवडून दिले. पण फडणवीस यांनी शाह यांच्या दबावाखाली 4 संचालक नेमले. कोल्हापुरातले 2 वळू मंत्री त्यांनी जे तांडव केले त्याचा परिणाम दिसला. त्याला लादणे आणि ओरबाडणे म्हणतात. लोकशाहीच्या दृष्टीने हानीकरण घडले आणि याचा परिणाम दिसेल. लोकशाहीला सुरुंग लावण्याचे काम केले. राज्यातील मंत्र्याना हे करणे शोभत नाही. ईडीला जे घाबरून पळून गेले ते शड्डू ठोकताला पाहिले. हे दिवस बदलतील तेव्हा पळून जाऊ नका. इतिहासात असा काळा दिवस नाही," अशी टीकाही त्यांनी केली.