'मी एकदा नाही हजारदा...', बाळासाहेबांचा फोटो फाडल्याने वाद निर्माण झाल्यानंतर शायना एनसींची पोस्ट, 'हिंमत असेल तर...'; राऊतांचा संताप 'हे जिथे दिसतील...'
सोनिया गांधींचं पुस्तक फाडताना शिवसेना नेत्या शायना एनसींकडून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने वाद निर्माण झाला आहे. यानंतर शायना एनसी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे.
सोनिया गांधींचं पुस्तक फाडताना शिवसेना नेत्या शायना एनसींकडून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने वादाला तोंड फुटलं आहे. सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करण्यासाठी शिवसेना प्रवक्त्यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी निषेध करण्याच्या नादात शायना एनसी यांच्याकडून बाळासाहेबांचा फोटो फाडला गेला. सोनिया गांधींच्या पुस्तकांमधील फोटो फाडताना हा प्रकार घडला आहे. यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असताना शायना एनसी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत उत्तर दिलं आहे. आपण मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडत होतो आणि हजारदा फाडणार असं त्यांनी म्हटलं आहे.
शायना एनसींची एक्स पोस्ट -
"याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा! काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाठा सेनेला आज मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडल्याचा इतका पुळका का आला आहे? मी एकदा नाही, हजारदा मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडेन! सावरकरांचा अपमान करणाऱ्यांविरोधात माझा निषेध ठाम आहे आणि तो असाच राहील. हिंमत असेल तर सावरकरांचा अपमान करणारे पुस्तक फाडून दाखवा!," असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.
हे ही वाचा - शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडल्यानंतर संजय राऊतांकडून दोन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, "बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विधानांचा निषेध करत त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. मग आज उद्धव ठाकरे यांच्यात तीच हिंमत आहे का? सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून दाखवणार का? की काँग्रेसच्या सत्तेच्या आणि राजकीय स्वार्थाच्या मोहापुढे सावरकरांचा स्वाभिमानही गहाण ठेवला आहे?".
"एक गोष्ट स्पष्ट ऐका — मणिशंकर अय्यरचा फोटो असो किंवा सावरकरांचा अपमान करणारे पुस्तक, मी ते एकदा नाही, हजारदा फाडेन! स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांच्या विचारांचा अपमान करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणे, हीच आमची भूमिका आणि हीच स्वातंत्र्यवीरांना खरी मानवंदना!," असं त्या म्हणाल्या आहेत.
'हे जिथे दिसतील तिथे यांना ठोका', संजय राऊतांचा संताप
संजय राऊत यांनीही बाळासाहेबांचा फोटो फाडल्याने एक्सवर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. हे जिथे दिसतील तिथे यांना ठोका असं थेट आवाहनच त्यांनी केलं आहे. "हे जिथे दिसतील तिथे यांना ठोका. बोला शिंदे, ही असली अवलाद घेऊन तुम्ही बाळासाहेबांचा विचार वाढवताय?," अशी विचारणा त्यांनी केली आहे.
"अमित शहा यांच्या शिंदेसेनेचे लोक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडत आहेत..कारण हे सगळे भाडोत्री आहेत, बरे झाले हे काळतोंडे आणि पांढऱ्या पायाचे लोक पळून गेले! याना ना कोणता विचार ना नैतिकता, ना एकच नेता ना निष्ठा..मा. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांच्या ढुंगणावर जाहिरपणे चाबकाचे फटके मारले पाहिजेत! मला आशा आहे मराठी माणूस तरी माझ्या या भाषेवर आक्षेप घेणार नाही!," असं त्यांनी म्हटलं आहे.