राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात मोठी अपडेट! भाजपाकडून हिरवा कंदील मिळताच...; नेतृत्व कोणाकडे सोपवणार?
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना मागील काही दिवसांपासून वेग आला आहे. यादरम्यान भाजपाच्या भूमिकेची अद्याप प्रतिक्षा आहे.
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस चर्चेच्या केंद्रस्थानी असून, दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत, भाजपच्या ग्रिन सिग्नल्सची प्रतिक्षा असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपा नेमकी काय भूमिका घेणार याची प्रतिक्षा असल्याचं समजत आहे. तसंच विलीनीकरण झाल्यास पक्ष नेतृत्व ते अर्थ खाते कोणाकडे जाणार? यावर चर्चेच गुऱ्हाळ सुरू असल्याचे समजत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील रस्सीखेच महत्वाकांक्षा, नेतृत्वाचा वाद आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी लढाई सुरू असल्याचे दिसत आहे. भाजपची भूमिका काय हे अजून स्पष्ट झालेले नाही, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अद्याप कोणतेही संकेत दिले नसल्याने विलीनीकरण होणार की नाही याबाबत स्पष्टता नाही.
विलीनीकरणात प्रमुख अडचणी कोणत्या?
कोणता पक्ष कोणत्या पक्षात विलीन होणार? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर त्यांचा अजित पवार गट स्वीकारेल का? आणि जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, आणखी एक आघाडी यांची भूमिका काय? केंद्रामध्ये सुप्रिया सुळे, सुनील तटकरे की प्रफुल्ल पटेल यांना संधी मिळणार? राज्यात विलीनीकरण झाले तर राष्ट्रवादीला अर्थ खाते दिले जाणार का? अशा अनेक अडचणी आणि प्रश्न विलीनीकरणाच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहेत.
दरम्यान शरद पवार गट अस्वस्थ असल्याची माहिती आहे. कारण देशात भाजपविरोधी वातावरण असून हा विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भाजपासोबत जाणे योग्य राहील का? असा सूर पवार गटातील काही नेत्यांचा आहे. मात्र, विलीनीकरणाच्या मार्गातील अडचणी दूर करण्यासाठी बहुतांश निर्णय (सत्तेतील सहभाग आदी) भाजपाचाच असल्याने विलीनीकरणाची चर्चा वेगाने पुढे सरकण्यात अडथळे येत असल्याचे सांगितलं जात आहे.
प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार या दोन्ही नेत्यांनी एकापाठोपाठ शरद पवार यांची भेट घेतल्याने या चर्चांना उधाण आलं असून आज किंवा उद्या प्रफुल्ल पटेल पुन्हा पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.
भाजपला विश्वासात घ्यावं लागेल - देवेंद्र फडणवीस
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत आमच्यासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र पक्ष आहेत त्यांच्या पक्षांचे निर्णय त्यांनीच घ्यायचे आहेत. त्यांच्या अंतर्गत निर्णयांवर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. मात्र दोन्ही पक्षांना एकत्र यायचं असेल किंवा विलीनीकरणाबाबत चर्चा करायची असेल तर भाजपला विश्वासात घ्यावं लागेल. कारण एनडीएमध्ये भाजप सर्वात मोठा भागीदार आहे असंही फडणवीस म्हणाले आहेत.