'हसन मुश्रीफ व चंद्रकांत पाटलांनी ‘गोकुळ’च्या निमित्ताने दाखवलेली चरबी ही...', ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल
"पराभव होऊनही सत्तेवर बसलेले हे ‘वळू’ महाराष्ट्रात थट्टेचा विषय ठरले आहेत. वळूंना आवरण्यासाठी कोल्हापूरचे हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले तरीही ‘वळूं’चे डोके ताळय़ावर आलेले नाही," असा उल्लेख करण्यात आलाय.
"'गोकुळ’च्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकीय इभ्रतीची लक्तरे वेशीवर टांगण्याचे राज्यातील सत्ताधाऱ्यांचे कार्य तडीस गेले आहे. कोल्हापुरातील दोन वळू व मुख्यमंत्रीपदावरील एका ‘चालू’ इसमाने मिळून नियम, कायदा, लोकशाहीचे पुरते धिंडवडे काढले. सतेज पाटील यांच्या आघाडीचे बहुमत असतानाही चालू व वळू यांनी मिळून निवडणूक ताब्यात घेतली व स्वतःचा अध्यक्ष गोकुळवर लादला," अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे.
लोकशाहीवर केलेला आघात
"हायकोर्टालाही ही बाब खटकली नाही व त्यांनी गोकुळवर लादलेल्या चार सदस्यांना मान्यता दिली. अॅड. राहुल मखरे या चळवळीतील कार्यकर्त्याने भेदक भाष्य केले आहे. ते समाजमाध्यमांवर म्हणतात, ‘‘बरं झालं, उच्च न्यायालयाने चार शासन नियुक्त सदस्यांच्या मतदानाला स्थगिती दिली नाही. स्थगिती दिली असती तर सतेज पाटील पॅनलची व्यक्ती गोकुळचा चेअरमन झाली असती आणि विषय जागीच संपला असता. शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र ‘भाजप’ने लोकशाहीवर केलेला बलात्कार विसरून गेला असता. आता पुढील अडीच-तीन वर्षे कोल्हापूरसह महाराष्ट्र कायम अस्वस्थ राहील. फडणवीस नियुक्त वळूंनी लोकशाहीला ओरबाडलेले रोज पाहील. आमच्या जखमा जिवंत ठेवेल. जनतेच्या मनातील निखारे कायम पेटते ठेवल्याबद्दल उच्च न्यायालयाचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.’’ कोल्हापुरात जे घडवले तो लोकशाहीवर केलेला आघात आहे. यानिमित्ताने हसन मुश्रीफ व चंद्रकांत पाटील यांनी अत्यंत हीन दर्जाचे राजकारण केले व खालच्या प्रतीची भाषणे केली," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
मस्तवाल ‘वळू’गिरी
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले लोक संस्कारी वगैरे असतात हा समज चंद्रकांत पाटलांनी खोटा ठरवला. पाटील यांना कोल्हापुरातून निवडणूक लढण्याची हिंमत नसल्याने ते पुण्यातील कोथरूड येथून निवडणूक लढतात. ते काही जनतेचे नेते नाहीत व आतापर्यंत कोणती संस्था त्यांनी उभी केली नाही की चालवली नाही. आज अमित शहांच्या कृपेने सत्तेची खुर्ची मिळाली म्हणून ते आव्हानाची भाषा करत आहेत. त्यांनी गर्जना केली की, ‘‘आमच्या नादाला लागू नका. मुख्यमंत्र्यांना सांगून तुमचे साम्राज्य एका दिवसात उधळून टाकू.’’ ही सत्तेची मस्ती आहे. सत्ता हाती असली की, उकिरड्यावरच्या कुत्र्यांनाही वाघाचे बळ येते व ते अशा विकृत गर्जना करतात. फडणवीस यांना सांगून साम्राज्य उद्ध्वस्त करू असे चंद्रकांत पाटील म्हणतात. ही धमकी आहे व सत्ता आहे म्हणून ते ही भाषा वापरत आहेत. हसन मुश्रीफ व चंद्रकांत पाटील यांनी ‘गोकुळ’च्या निमित्ताने दाखवलेली चरबी ही मस्तवाल ‘वळू’गिरी आहे," असा घणाघात ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.
हा पैसा येतो कोठून?
"वळू हा मोकाट सोडलेला मस्तवाल प्राणी असतो. तो नांगरणीच्या कामाचा नसतो. कुणाच्याही शेतात, बांधावर, भाजी बाजारात घुसून तोंड घालतो. फुकटचं पोटभर खाल्ल्याने वळू नेहमी मस्तीत असतो व रस्त्याच्या मधोमध ठिय्या मांडून बसतो. येणाऱ्या-जाणाऱ्यांची त्यामुळे अडचण होते. हसन मुश्रीफ व चंद्रकांत दादा हे त्या वळूप्रमाणे फुकटात ‘गोकुळ’मध्ये घुसून हुंदडत आहेत. पराभव होऊनही सत्तेवर बसलेले हे ‘वळू’ महाराष्ट्रात थट्टेचा विषय ठरले आहेत. वळूंना आवरण्यासाठी कोल्हापूरचे हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले तरीही ‘वळूं’चे डोके ताळय़ावर आलेले नाही. चंद्रकांत पाटील हे ‘वळवळू’न बोलले की, ‘‘सतेज पाटील यांचे वडील डी.वाय. पाटील हे कोल्हापुरात स्कूटरवरफिरताना आम्ही पाहिलंय. आता त्यांचे इतके मोठे साम्राज्य कसे उभे राहिले? ते उद्ध्वस्त करू.’’ यावर पुण्याच्या रवींद्र धंगेकर यांनी पाटलांना उत्तर दिले, ‘‘मग तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होता की काय?’’ हा सवाल बिनतोड आहे. पाटील हेसुद्धा एकेकाळी मोडक्या सायकलवर फिरत होते व अमित शहांच्या कृपेने ते आता गडगंज बनले. जिंकण्यासाठी कोटय़वधी रुपये ते खर्च करतात. हा पैसा येतो कोठून?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.
पाटील-मुश्रीफांच्या पोटात का दुखावे?
"डी. वाय. पाटील यांनी मोठे शैक्षणिक संस्थान उभे केले. त्याचा मराठी माणसाला गर्वच असायला हवा. या गौरवशाली कार्याबद्दल पाटील-मुश्रीफांच्या पोटात का दुखावे? दुसऱ्याच्या भरभराटीची पोटदुखी हा भाजपवाल्यांचा जुना आजार आहे. दुसरे ‘वळू’ मुश्रीफ हे ‘ईडी’च्या भीतीने पार्श्वभागाला पाय लावून पळाले व भाजपच्या तंबूत घुसले. त्यांचे शरीर वाघाचे आणि काळीज उंदराचे आहे. तेही सत्ता आहे म्हणून वल्गना करत आहेत. कोर्टाने चार नामनियुक्त सदस्यांच्या विरोधात निर्णय दिला तर फडणवीस यांना सांगून ‘गोकुळ’वर प्रशासक नेमू ही भाषा एका मंत्र्याची नसून गावात मोकाट सोडलेल्या ‘वळू’ची आहे. कोल्हापुरात दोन ‘वळू’ मोकाट सुटले आहेत. त्यांच्यापासून लोकशाहीला धोका आहे. त्यांचा बंदोबस्त करावाच लागेल," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.