आयफोन घेण्यासाठी एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते हे दर्शवणारी एक घटना सध्या चर्चेत आहे. आयफोनसाठी सूनेने केलेला पराक्रम पाहून सासूच्या पायाखालची जमीनच हादरली आहे. यानंतर सासूने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्या सूनेविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. चौकशीदरम्यान सूनेने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
नागपूरमधील सूनेनेच आपल्या सासूचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे सूनेने सुमारे 53 ग्रॅम सोन्याचे दागिने विकून त्यातून मिळालेल्या पैशातून आयफोन (iPhone) खरेदी केला. चोरीला गेलेल्या दागिन्यांची अंदाजे किंमत अडीच लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर शांतीनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
नागपूरच्या शांतीनगर परिसरात ही घटना घडली आहे. 52 वर्षीय महिलेने याप्रकऱणी तक्रार दाखल केली आहे. ही महिला प्रेमनगर येथे वास्तव्यास आहे. तक्रारीनुसार, 27 जुलै 2026 रोजी त्यांना शिर्डीला दर्शनासाठी जायचं होतं. प्रवासाची तयारी करण्यासाठी त्यांनी कपाट उघडलं असता सोन्याचे दागिने गायब असल्याचं लक्षात आलं. यानंतर महिलेने घरातील सदस्यांकडे यासंदर्भात विचारणा केली. मात्र सर्वांनीच आपल्याला यासंदर्भात काही कल्पना नसल्याचं सांगितलं. बराच वेळ शोध घेऊनही दागिने सापडले नाहीत.
महिलेला यादरम्यान आपली सून ग्रंथाली वर्मावर संशय आला. यानंतर तिने सूनेकडे चौकशी केली असता तिने दागिने विकून त्या पैशातून आयफोन घेतल्याची कबुली दिली. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रंथाली कधी माहेरी तर कधी सासरी येत जात असे. कौटुंबिक वाद सुरु असतानाच हे दागिने गायब झाले होते.
तक्रारीनुसार, गायब झालेल्या दागिन्यांमध्ये सुमारे 30 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, 13 ग्रॅमचा सोन्याचा हार आणि इतर 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे. एकूण 53 ग्रॅम सोन्याचे दागिने गायब असून, त्यांची अंदाजे किंमत अडीच लाख रुपये इतकी आहे.
जेव्हा त्या महिलेने आपल्या सुनेकडे दागिने परत मागितले, तेव्हा तिने ते देण्यास नकार दिला. त्यानंतर, त्या महिलेने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. शांतीनगर पोलिसांनी ग्रंथली आकाश वर्मा हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शांतीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय कामटे यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली.