अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुक : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजल आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातलं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. महायुतीत ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार की शिवसेनेला मिळणार, यावरून जोरदार चर्चा सुरू आहेत. भाजपकडून चंद्रशेखर भोयर आणि संगीता शिंदेंना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे तर शिवसेनेकडून विद्यमान आमदार किरण सरनाईक आणि माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडेंच्या नावांची चर्चा आहे. त्यामुळे अमरावती शिक्षक मतदारसंघाची लढत आता रंगतदार होण्याची चिन्हं आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, 23 ऑक्टोबरला मतदान, तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. 29 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 6 ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. महायुतीमध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
भाजपकडून चंद्रशेखर भोयर आणि संगीता शिंदे यांच्या नावांची चर्चा आहे. याचवेळी विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का, याकडेही लक्ष लागलं आहे. ताज्या वृत्तांमध्ये भाजप आणि शिंदे गटातलं जागावाटप अद्याप स्पष्ट नाही. माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडेंचं नावही पुन्हा चर्चेत आहे. 2020 मध्ये देशपांडेंना पराभव स्वीकारावा लागला होता. आता शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. यापूर्वी देशपांडेंनी शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केली होती. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून प्रा. आदिती पोहरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र अंतिम उमेदवारी आणि मविआतील जागावाटपाबाबत अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. दरम्यान शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी परिवर्तन गरजेचं आहे, असं मत पोहरेंनी व्यक्त केलं.
शिवसेना युबीटीनं अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी बुलढाण्याचे प्रा. दत्तात्रय डी. एस. लहाने यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या उमेदवारीनंतर ठाकरे गटानं पाचही जिल्ह्यांत प्रचार आणि संघटनात्मक हालचालींना वेग दिल्याचं वृत्त आहे. दुसरीकडे, महायुतीत जागावाटपाचं घोंगडं अजूनही भिजत असलं तरी भाजपमध्ये राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे निवडणूक लढण्याच्या तयारीत असून भाजपचे शेखर भोयर हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे भाजप कुणाच्या पारड्यात तिकीट टाकते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2020 मध्ये झालेल्या किरण सरनाईक यांनी निवडणुकीत पैठणी वाटल्याचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता मात्र आता या निवडणुकीत पैठणी चालणार नसल्याचा टोला आमदार किरण सरनाईक यांना भाजपचे संभाव्य उमेदवार शेखर भोयर यांनी लगावला.
अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात शिक्षकांचे प्रश्न निवडणुकीत महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. अनुदान, संचमान्यता, जुनी पेन्शन योजना आणि सेवा-संबंधित प्रश्नांवर उमेदवारांकडून भूमिका मांडल्या जाण्याची शक्यता आहे. एकीकडे महायुतीत भाजप की शिवसेना शिंदे गट, याचा फैसला होणं बाकी आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात जागावाटपाचं चित्र स्पष्ट व्हायचं आहे. ठाकरे गटाने दत्तात्रय लहाने यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी मविआतील अंतिम राजकीय समीकरण काय राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.