दिवाळीच्या पहिल्याच दिवशी कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे. नागपुरात कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी घरी आलेल्या शिक्षक दाम्पत्याने लक्ष्मीपुजनाच्या दिवशी गळफास घेत आत्महत्या केली आहे. बेसा रेवतीनगर येथे ही घटना उघडकीस आली आहे.
मनीष प्रल्हाद गणवीर आणि सोनाली मनीष गणवीर (अशी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शिक्षक दाम्पत्यांची नाव आहे. दोघेही गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड येथे एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. ऑगस्ट महिन्यात दोघांचेही लग्न झाले होते. दोघांचेही हे दुसरं लग्न होतं.
दाम्पत्य शाळेला दिवाळीची सुट्टी लागल्यानंतर नागपूर येथे त्यांच्या घरी आले होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांचे एक नातेवाईक सकाळी सव्वानऊच्या सुमारास त्यांना भेटण्यासाठी घरी गेले होते. बराचवेळ दरवाजा ठोठावूनही आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता.
घरातून प्रतिसाद मिळत नसल्याने नातेवाईकांनी पत्राच्या शेडवरुन दुसऱ्या मजल्यावरील गॅलरी गाठली. खिडकीतून पाहिले असता बेडरूममध्ये दोघेही ओढणीच्या साहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. तात्काळ बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी मेडिकल रुग्णालयात पाठवली आहेत.
पती-पत्नीने टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोघांनीही मृत्यूला कवटाळल्याने यावरून गुढ वाढले आहे. बेलतरोडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, या घटनेमागील कौटुंबिक किंवा अन्य कारणांचा तपास सुरू आहे.
वाढदिवसाच्या पार्टीत फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना देवनगर परिसरात घडली आहे. अमन ऊर्फ बॉबी सुनील सपाटे असे मृत तरुणाचे नाव आहे. मित्र प्रसाद राऊत याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अमन देवनगर येथे गेला होता.
यावेळी फटाके फोडण्याच्या कारणावरून काही तरुणांमध्ये वाद झाला. एका थप्पड मारण्यावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात अमन गंभीर जखमी झाला. त्याला प्रथम ऑरेंज सिटी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.