कोणाचा कधी, कुठे आणि कसा मृत्यू होईल सांगता येत नाही, असं म्हटलं जातं. अनेकदा छोटीशी चूकही मृत्यूस कारणीभूत ठरते. तर कधी चुकीच्या वेळी, चुकीच्या ठिकाणी असणंही एखाद्याच्या मृत्यूचं कारण ठरु शकतं. असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये घडला असून एका 39 वर्षीय व्यक्तीचा अत्यंत विचित्र अपघातामध्ये जखमी झाल्याने मृत्यू झाला आहे. कल्पनाही करता येणार नाही अशा विचित्र अपघाताचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
नक्की कुठे घडला हा प्रकार?
हा सारा प्रकार नाशिकमधील सिडको येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चौकामधील लिकर कट्टा वाईन शॉपमध्ये घडला आहे. वाईन शॉपमधील सीसीटीव्हीमध्ये नेमका हा अपघात कसा झाला हे कैद झालं आहे. या व्हिडीओमध्ये मद्य विक्री करणाऱ्या काऊंटवरील व्यक्ती टेबलजवळ उभी असताना अचानक कोसळल्याचं दिसून येत आहे. समोर काऊंटवरील ग्राहकांना नेमकं काय झालं हे समजलचं नाही. त्यावेळी या व्यक्तीला उचलण्यासाठी एक सहकारी धावून गेल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
नेमकं झालं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, काऊंटरखाली असलेल्या प्लायवूडच्या प्रेशर गनचा ट्रीगर दाबला गेल्याने सुटलेला खिळा थेट काऊंटवरील व्यक्तीच्या हृदयात घुसला. या साऱ्या विचित्र प्रकारामध्ये 39 वर्षीय सुनील अनिल तायडे गंभीर जखमी झाले. हा सारा प्रकार सायंकाळी 6 वाजून 51 मिनिटांच्या सुमारास घडल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि राखाडी रंगाची पँट घातलेले सुनील तायडे हे अचानक शॉपमधील फ्लोअवर कोसळल्याचं सीसीटीव्हीमध्ये पाहायाला मिळत आहे. आधी सुनील यांना काय झालंय हे कोणाच्या लक्षात आलं नाही. नंतर त्यांच्या छातीत खिळा घुसल्याचं लक्षात आल्याने त्यांना तातडीने साडेसातच्या आसपास उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.
चार तास मृत्यूशी झुंज
डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. सुनील यांनी जवळपास चार तास मृत्यूशी झुंज दिली. पण रात्री 12 वाजता सुनील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
पोलीस चौकशी सुरु
या प्रकरणामध्ये पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून प्लायवूडच्या प्रेशर गन टेबलखाली कशी आली? नेमकं इथं झालं काय याची माहिती प्रत्यक्ष साक्षीदारांच्या जबाबामधून नोंदवली जाणार आहे. मात्र अशाप्रकारे अचानक एखाद्यावर काळाने झडप घातल्याचं सीसीटीव्ही व्हिडीओत पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली असून हा प्रकार दुर्देवी असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.