SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

सुशिक्षित मतदारांनी महायुतीला नाकारलं... राज्यातील पदवीधरच्या सगळ्या जागा महाविकास आघाडीला; नागपुरात BJP ला धक्का, संभाजीनगरमध्ये शरद पवारांच्या NCP चं धक्कातंत्र

राज्यातील सुशिक्षित पदवीधर मतदारांनी सत्ताधारी महायुतीकडे पाठ फिरवल्याचं चित्र पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं आहे. नेमकं या मतदारसंघांमध्ये काय झालं? कोणाला किती मतं मिळाली? जाणून घ्या सविस्तरपणे...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 29, 2026, 07:43 AM IST | Updated: Oct 29, 2026, 08:07 AM IST
Image Credit: महायुतीला मोठा धक्का (प्रातिनिधिक फोटो)
Join

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, भाजप, काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले आहेत. पदवीधरच्या तिन्ही जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळाल्याने पदवीधरांनी महायुतीला नाकारल्याचे चित्र आहे. कोणी, कुठे आणि किती मतांनी विजय मिळवलाय जाणून घेऊयात सविस्तरपणे...

कुठे कुठे झाली निवडणूक? निकालाचं वैशिष्ट्य काय?

पाचही मतदारसंघांतील मतमोजणी जवळपास 36 तास सुरू होती. कोणत्याच मतदारसंघात पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे विजयी उमेदवारांना मते मिळाली नाहीत. परिणामी दुसर्‍या किंवा तिसर्‍या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागली. त्यामुळेच मतपत्रिकांच्या आधारे झालेल्या निवडणुकीत मतमोजणीस बराच कालावधी लागला. पदवीधरच्या पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या तिन्ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. पुणे व औरंगाबाद पदवीधर मतदारसंघांतून शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले. नागपूरमध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर नितेश कराळे यांच्या दुसर्‍या पसंतीच्या मतांच्या आधारे आघाडी घेतली होती.

नागपुरमध्ये भाजपाला धक्का

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या मैदानावर काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी 3 हजार 271 मतांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना प्रथम व द्वितीय पसंतीक्रमाची एकूण 67 हजार 231 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना 63 हजार 960 मते मिळाली. रात्री 1 वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती. म्हणजेच तब्बल  41 तासांपेक्षा जास्त तास ही मतमोजणी चालली. पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक 75 हजार 438 मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेनुसार द्वितीय पसंतीक्रमाची बाद फेरी घेण्यात आली. पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये 1 लाख 65 हजार 906 मतांपैकी 15 हजार 32 मते अवैध ठरली. तर  1 लाख 50 हजार 874 मते वैध ठरली. द्वितीय पसंतीच्या बाद फेऱ्यामध्येही कुठल्याही उमेदवाराला निर्धारित कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे पहिल्या व द्वितीय पसंतीक्रमाच्या बाद फेरी मिळून सर्वाधिक 67 हजार 231 मते घेत अभिजित वंजारी यांना विजयी घोषीत करण्यात आले.

नक्की वाचा >>
गड आला पण सिंह गेला... मोदींच्या वाराणसीमध्ये कोण निवडून आलं पाहिलं का?

पुण्यात शरद पवारांच्याच पक्षाचं वर्चस्व

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा जाधव-देशमुख विजयी झाल्या आहेत. त्यांनी अटीतटीच्या लढतीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांचा 9928 मतांनी पराभव केला. या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावरील आपले वर्चस्व कायम राखले आहे. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत हर्षदा देशमुख यांना 111279 मते तर डॉ. स्मिता जाधव यांना 102427 मते मिळाली. दोन्हीपैकी कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेला 113113 मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. कोटा पूर्ण न झाल्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू करण्यात आली. कमी मते मिळालेल्या उमेदवारांना बाद करत त्यांची दुसऱ्या पसंतीची मते आघाडीवरील उमेदवारांमध्ये विभागण्यात आली. अखेर 44 व्या बाद फेरीत हर्षदा देशमुख यांनी विजयाचा टप्पा ओलांडला आणि त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले

छत्रपती संभाजीनगरमध्ये 18 वर्षांची सत्ता संपवली

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी या मतदारसंघातून विजय संपादित केला आहे. त्यांनी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांचा पराभव केला असून, चव्हाण यांच्या 18 वर्षांचं वर्चस्व संपवण्यात शरद पवारांच्या पक्षाला यश आलं आहे. डॉ. प्रतापसिंह पाटील यांना पहिल्या पसंतीची 73931 मतं मिळाली. तर पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये सतीश चव्हाणांच्या बाजूने 60768 मतं पडली. याचबरोबर अपक्ष उमेदवार रविराज साबळे यांनाही पहिल्या पंसतीची 19835 मतं मिळाली. खरं तर पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी 13 हजारांपेक्षा जास्त मतांची निर्णायक आघाडी घेतली होती. मात्र, कोणत्याही उमेदवाराला आवश्यक असलेला 88558 मतांचा विजयाचा कोटा पूर्ण करता न आल्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू करण्यात आली. चिकलठाणा एमआयडीसी येथील मतमोजणी केंद्रावर 70 टेबलांवर तब्बल दोन दिवस ही मतमोजणी प्रक्रिया अत्यंत संथ आणि प्रदीर्घ चालली. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण 41 उमेदवार होते. मात्र, मुख्य उमेदवारांशिवाय इतरांना फारशी मते न मिळाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप घुगे यांच्यासहीत तब्बल 38 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.

पदवीधरमध्ये कोण मतदान करतं?

सर्वसामान्य नागरिक पदवीधर आमदार निवडून देऊ शकत नाही. ज्या नागरिकांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान तीन वर्षांपूर्वी आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि ज्यांनी 'पदवीधर मतदार' म्हणून नोंदणी केली आहे, तेच या निवडणुकीत मतदान करतात. पदवीधर आमदारांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. हे मतदारसंघ शिक्षक मतदारसंघासारखे भौगोलिक दृष्ट्‍या आकाराने खूप मोठे असतात. या निवडणुकीची सर्वात वेगळी ठरणारी बाब म्हणजे या निवडणुकीत 'पसंतीक्रम' पद्धतीने मतदान होते, म्हणजेच मतदार उमेदवारांना 1,2,3 असा पसंतीक्रम देतात. पहिल्या पसंतीची किती मतं मिळाली, दुसऱ्या पसंतीची किती मिळाली आणि तिसऱ्या पंसतीची किती मतं मिळाली या साऱ्याचा विचार करुन अंतिम निकाल जाहीर केला जातो.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES