संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळ निवडणुकीमध्ये समविचारी पॅनल प्रमुख काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी एकट्याने विजयश्री खेचून आणत महायुतीची गोकुळवरील सत्ता संपुष्टात आणली. विशेष म्हणजे विरोधात तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, जिल्ह्यातील दहा आमदार अशी तगडी फळी असतानाही सतेज पाटलांच्या नेतृत्वाखालील समविचारी पॅनलने 25 पैकी 13 जागा मिळावीत बहुमत मिळविले. या पराभवानंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. कागल तालुक्यातील संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे.
हसन मुश्रीफ काय म्हणाले?
गोकुळ निवडणुकीच्या निकालानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी समर्थकांना निराश न होण्याचं आवाहन केलं आहे. "गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यामुळे निराश होऊ नका. उद्यापासून आपण पुन्हा एकदा कामाला लागू या," असं म्हणत मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांमध्ये जीव फुंकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पुढे बोलताना, "पराभवाचे चिंतन करण्यासाठी उद्या मेळावा बोलवलेला आहे. त्याला सर्वांनी उपस्थित रहावे या मेळाव्यामध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचे चिंतन करावं लागेल," असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पुढे महायुती या ठिकाणी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हसन मुश्रीफांचे पुत्र पराभूत
महायुतीला कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या निडणुकीमध्ये 12 जागांवर समाधान मानावं लागलं. तर सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा मिळावीत बहुमतावर शिक्कामोर्तब केलं. या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफांचे पुत्र नावेद मुश्रीफांचा पराभव झालाय. शौमिका महाडिक यांनीही पराभवाला सामोरं जावं लागलं. गोकुळमध्ये तब्बल 35 वर्षे सत्ता गाजविणाऱ्या विश्वास पाटील आणि अरुण कुमार डोंगळे यांचा देखील पराभव झाला.
फेर मतमोजणीमुळे तणाव
गोकुळची मतमोजणी ही दुपारी चार वाजताच संपली होती, मात्र त्यानंतर महायुतीच्या शौमिका महाडिक यांनी फेर मतदान घेण्याची मागणी केली. पण त्यानंतर झालेल्या मतमोजणीत देखील महाडिक यांना पराभवाला समोर जावे लागले. त्यानंतर महायुतीचे उमेदवार युवराज पाटील आणि विश्वास पाटील आबाजी यांनी फेर मतमोजणीची मागणी केली, पण निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी सबळ कारण न देता फेर मतमोजणी मागितल्याने दिलेला अर्ज नामंजूर केला, त्यामुळे गोकुळमध्ये समविचारी आघाडीला 13 आणि महायुतीला पॅनलला 12 जागा मिळाल्या.